उद्योगपती

पहाटेची 3 ची वेळ ही काही सहज म्हणून फिरायला जाण्याची वेळ नाही. पण शहर नवीन असेल, तुम्ही एकटे असाल, आणि एरिया हाय प्रोफाईल असेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोप येत नसेल, तर फिरायला जाण्यासाठी कोणतीही वेळ अयोग्य नाही. उलट अशा अनवट वेळाच बऱ्याचदा आपल्याला त्या शहराबद्दल दोन वेगळ्या गोष्टी सांगून जातात.
..आणि त्या दिवशी त्या दोन वेगळ्या नव्हे, दिग्मूढ करणाऱ्या गोष्टी समजणे माझ्या नशिबात होते. उतरलेल्या हॉटेलमधून बाहेर येऊन मी सरळ मुख्य रस्ता धरला. शहराच्या त्या भागात बहुतांश हॉटेलं आणि पब्ज, क्लब्जची रेलचेल असल्याने रात्रीचे दहा वाजल्यासारखा माहौल होता. चकाचक विदेशी बनावटीच्या गाडयांनी पार्किंग लॉट ओसंडून वाहत होते. त्या रंगीबेरंगी विश्वाचा नजारा न्याहाळत मी फुटपाथवरून रमत-गमत चाललो होतो, चालता-चालता मी पुढच्या मोठ्या चौकात आलो. आता चौक पास करून सरळ पुढे जावं की डावा अथवा उजवा रस्ता पकडावा की सरळ मागे फिस्न रूमवर जावं या विचारात असतानाच मला कुतूहल जागं करणारं ते दृश्य दिसलं.
चौकात रेंगाळलेल्या एका कारच्या खिडकीशी झुकून एक मनुष्य, भिकारीच असावा असं त्याच्या कपड्यांवर वाटत होतं, कारमधल्या मालकाच्या विनवण्या करत होता. अखेर मालकाने त्याच्या अंगावर शंभराची नोट भिरकावली आणि ती कार वेगाने रस्त्यावरच्या तुरळक वाहतुकीत अंतर्धान पावली.
एक सर्वसाधारण दृश्य. त्याची नोंद कळत-नकळत नोंद घेऊन मी पुढचा रस्ता धरणार होतो. पण, त्या भिकाऱ्याच्या नंतरच्या कृतीने माझी उत्सुकता चाळवली गेली. शंभराची नोट खिशात टाकून तो भिकारी चौकातून डावीकडे वळला, मात्र असं करताना त्याच्या देहबोलीत विलक्षण फरक पडला होता. मघाशी शरीराच्या प्रत्येक अवयवातून व्यक्त होणारी लाचारी अचानक लुप्त होऊन, त्यात एक प्रकारचा अपराईटनेस आला होता. त्या चालण्यात एक प्रकारचा सावधपणा आणि लगबग होती, त्याच्या लक्षात येणार नाही इतकं अंतर ठेवून मीही त्याच्यामागे चालू लागलो.

रस्त्यावरच्या एका अंधाऱ्या भागातून आता आम्ही जात होतो, भिकाऱ्याचं चालणं आता थोडं मंद झालं होतं, अखेर एका फारशी वर्दळ नसलेल्या अंधाऱ्या कोपऱ्यात तो थांबला. खांद्यावरची मळकट पिशवी त्याने खाली घेतली. घाईत त्यातून काहीतरी बाहेर काढलं.. कपडेच होते ते. झटपट त्याने अंगावरचे फाटके, मळकट कपडे उतरवले आणि पिशवीत कोंबले. पिशवीतले काढलेले कपडे अंगावर चढवले, स्वच्छ पांढराशुभ्र शर्ट आणि गडद निळी पॅंट. खिशातून कंगवा काढून त्याने अंदाजानेच स्वत:चे केस विंचरले. पिशवीतून नॅपकीन काढला आणि खसाखसा स्वत:चा चेहरा नॅपकीनने पुसला. कायापालट. अक्षरश: कायापालट झाला होता त्याचा. पंधरा मिनिटांपूर्वी हाच माणूस पलिकडच्या चौकात चक्क भीक मागत होता, असं जर मी आता कुणाला सांगितलं असतं, तर त्याने मलाच अकलेचा भिकारी आहेस का, असं विचारलं असतं.
पिशवी उचलून समोरचा “भिकारी”आता चालू लागला, मीही त्याच्या मागोमाग चालू लागलो. रस्ता जिथे संपत होता, त्या टोकाशी एक रिक्षा उभी होती. भिकाऱ्याने रिक्षावाल्याला हात केला, पाच मिनिटांतच भिकारी रिक्षात बसून स्टेशनच्या दिशेने गेला देखील..
..हा प्रकार काय आहे, याचा तपास लावल्याशिवाय परतायचं नाही, असं ठरवून मी मागून येणाऱ्या रिक्षाला हात दिला आणि स्टेशनला घ्यायला सांगितलं. रस्ता मोकळा असल्याने ती रिक्षा नजरेच्या टप्प्यातच होती.
हा प्रकार काय आहे, हे जाणून घ्यायची माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती..

स्टेशनसमोरच्या पानाच्या टपरीजवळच तो मला दिसला. पांढरपेशा नोकरदार माणसासारखा तो सिगरेट ओढत उभा होता. आता आपण काय करावं, ते कळेना म्हणून मीही थेट टपरीजवळच गेलो आणि सिगरेट शिलगावली.
काय साहेब, कुणाला शोधताय?
त्याचा प्रश्न मला अगदीच अनपेक्षित नव्हता, पण मी त्याच्या मागावर आहे, हे त्याने फार पटकन ओळखल्याचं मला आश्चर्य वाटलं.
नवीन पोस्टिंग दिसतेय तुमची.
म्हणजे तो मला पोलिस समजला होता.
मी पोलिस नाही, मी एका वाक्यात त्याची उत्सुकता संपवली.
समोरच्या माणसाला मी पत्रकार आहे, असं सांगितल्यावर दोन गोष्टी शक्य असतात,
एक तर तो काहीच बोलत नाही, किंवा खूपच बडबड करायला लागतो.
सुदैवाने तो दुसऱ्या प्रकारातला निघाला. आणि त्याने त्याची अद्‌भूत किंवा नॉट सो अद्‌भूत अशी कहाणी मला ऐकवली.
पुढच्याच स्टेशनवर उतरून तो आपल्या घरी जाणार होतो. घर म्हणजे तुमच्या-आमच्यासारखं वन बीएचके फ्लॅट.
त्याचं या व्यवसायातून येणारं उत्पन्न दरमहा साधारण तीसएक हजार रूपये होतं, होय, तीनएक नाही तीसएक.
भीक मागणे हा त्याचा व्यवसाय होता. त्यासाठी तो त्या उच्चभ्रू वस्तीत रोज रात्री आठ ते पहाटे तीन अशी ड्‌यूटी करत असे. रोज घरू न निघताना तो टापटीप, स्वच्छ कपडे घालून निघत असे. आज त्याने जिथे कपडे बदलले, तशाच कमी वर्दळीच्या जागी थांबून तो भिकाऱ्याचा वेश परिधान करे. पहाटे तीनला ऑफिस संपल्यावर तो पुन्हा कपडे बदलून घरी जाई. गेली 20 वर्षे तो हे करत होता.
याच वीस वर्षांच्या कमाईतून त्याने मुलांची शिक्षणं केली, त्याचा एक मुलगा झाडू विकण्याचा व्यवसाय करतो, तर दुसरा कॉलेजला आहे. सध्या राहत असलेल्या वन बीएचके फ्लॅटव्यतिरिक्त त्याने दुसराही एक मोठा फ्लॅट बुक केला आहे, लवकरच त्याचा ताबा मिळेल. याशिवाय इतरही व्यवसायांत त्याने पैसा गुंतवलेला आहे.
एकूण तो आपले दैन्यावस्थेतील, दरिद्री जिण्याचा पुरेपूर उपभोग घेतो आहे.
दिवसाला हजार रूपयांची बेगमी देणारा असा व्यवसाय दुसरा नाही, असं त्याचं मत आहे.
त्याच्या व्यवसाय एरियात गेली वीस वर्षे त्याची एकट्याची मक्तेदारी आहे, दुसऱ्या कुणालाही तो इथं पाय रोवू देत नाही. त्यासाठी भाईंपासून सायबापर्यंत सर्वांची फिल्डिंग त्याने व्यवस्थित लावली आहे.

..हातातल्या सिगरेटचा चटका बसला, तेव्हा मी भानावर आलो. तो नुकताच निघून गेला होता.
धक्क्यातून बाहेर येत मी रिक्षाला हात केला,
बाबा कुछ खाने को दो..
एक भिकारी रिक्षावाल्यापुढे हात पसरत होता.
..मला मात्र त्याच्या जागी सुटा-बुटातला कडक् उद्योगपती दिसू लागला होता.

- अमोल कपोले

Published in: on जुलै 8, 2009 at 11:42 am Comments (4)
Tags:

तहान

पावसानंतर त्याचा
दर्वळ राहून जातो
तसा
गेल्यानंतर तुझा
वावर राहून जातो

पाउस सरतो विखरून थेंब
मातीत सांडलेले
तू गेल्यावर माझे शब्द
मौनात बांधलेले

अंगोपांगी टिपतो श्रावण
ओसरल्या थेंबांचे भास
एकलाच मग वेचित बसतो
रेंगाळलेले ओले श्वास

चिंब भोवती ओल्या भरते
तृप्त तजेली हिरवी भूल
नकळत ठायी पेरित जाते
तव भेटीची तहान खोल

- अमोल कपोले

Published in: on जुलै 7, 2009 at 11:25 am Leave a Comment

पदर

photogaphersdirect.com वरुन साभार

photogaphersdirect.com वरुन साभार

रानातली वाट
घाटाच्या मिठीत
पाउस पालवे
मातीच्या दिठीत

रानातली वाट
वळणी हसली
निर्झराच्या गूढ
प्रवाही फसली

रानच्या वाटेला
थेंबांचे लाघव
तळ्यात निळाई
फुलवी राघव

वाटेतली आण
रानात सुटते
प्रपातली आस
दरीत फुटते

रानातली वाट
प्रवासी शिणते
तुझ्यामाझ्यातला
पदर विणते

- अमोल कपोले

Published in: on जुलै 6, 2009 at 10:30 am Leave a Comment

दिवेलागण

दिवेलागणीला
सांज धुकाळली
सरींवर सर
अवचित

पाउस एकांती
पाहुणा होउन
दारात भेटतो
थेंबथेंबी

चिंबओली धून
मनात रुजली
सूरातून तुझ्या
पालवते

कसा हा रोखावा
आवेगी कोसळ
भिजण्याचे भान
हरपले

- अमोल कपोले

Published in: on जुलै 5, 2009 at 11:02 am Leave a Comment

निरोप

दूरदेशी तुझ्या
पाउस पडतो
मातीतून सय
दारी आली

एक मेघ आला
ओळख घेउन
सरींतून तुझ्या
निरोपला

तुझ्याच थेंबांचा
उलट सांगावा
“लोचनी आठव
काठोकाठ”

अंगणी घुमतो
चातकला स्वर
परतून येई
भिजवाया

- अमोल कपोले

Published in: on जुलै 4, 2009 at 12:01 pm Comments (1)

सय

अर्धाकच्चा
चिंबकोवळा
अलगद ओला
तृणांत शिरला
थेंब

कापुसला
श्यामलरंगी
दाटून आला
तुडुंब भरला
मेघ

ओली गच्च
कोसळवेडी
दंवात उरली
उरात भरली
सर

सुगंधली
रंगबावरी
क्षणात भिजली
उन्हात सजली
माती

काठोकाठ
व्याकुळ डोळां
घनास फितली
मनात रुतली
सय!

- अमोल कपोले

Published in: on जुलै 2, 2009 at 11:15 pm Comments (7)

निरर्थक..निर्हेतुक

निव्वळ उपयोगितेवर आधारित जगण्यावर त्याचा विश्वास नव्हता. हाताशी उपयोगाचं काम नसल्याने तो आपल्याच खुळ्या नादांत रमायचा. पुरुषांची, स्त्रियांची चित्रं काढणं, सुंदर शिल्प घडवणं असं बरंच काही. जगाच्या दृष्टीनं जे काही निरुपयोगी होतं, निरुद्देश होतं, त्यातच तो वेळ घालवित असे. लोक त्याला हसायचे. त्यालाही कळायचं, आपण काहीतरी “उद्योग” करायला हवा. तो प्रयत्नही करीत असे. पण दुसर्‌या कामांत त्याचं मन लागत नसे.

काही मुलं क्वचितच अभ्यास करतात, आणि तरीही परीक्षेत पास होतात. याच्या बाबतही तसंच झालं. अवघं आयुष्य निरर्थक गोष्टींत घालवूनही मृत्युनंतर कशी कोण जाणे, याला स्वर्गाची दारं खुली झाली. आणि दैवगती म्हणावी की काव्यगत न्याय कुणास ठाउक, पण याला स्वर्गात घेउन आलेल्या देवदुताने महाशयांची रवानगी नेमकी कामसूंच्या नंदनवनात केली.

कामसूंच्या नंदनवनात निवांतपणा सोडून सारं काही सापडेल.

इथले पुरुष म्हणतात, “देवा, आमच्याकडे रिकामा घालवायला एक नॅनो सेकंदही नाही.”

बायका म्हणतात, “चला पटापटा कामं उरका, काळ पुढे चालला. थांबला तो संपला”

सारेच म्हणतात, “अजून भरपूर कामं उरकायचीत. हातातला प्रत्येक क्षण सार्थकी लागला पाहिजे.”

असं सांगताना ते तक्रारवजा उसासे टाकतात खरं, पण याच शब्दांनी त्यांना बळ येतं आणि ते जोमाने कामाला लागतात हेही खरं.

या सार्‌या वातावरणाला त्याचा स्वभाव जराही मिळता जुळता नव्हता. अहो, मर्त्यलोकातलं अवघं आयुष्य ज्याने कसलंही काम न करता घालवलं, तो या कामसूंच्या नंदनवनात कसा रुळेल? त्यामुळे स्वारी दिवसभर भटकंती करत राही. हिरवाईशी हितगूज करी. झर्‌यांच्या सान्निध्यात वेळ घालवीत असे. नंदनवनातली कामसू माणसं त्याच्याकडे “वाया गेलेलं प्रकरण” असं समजून दुर्लक्ष करायचे.

तर अशा या ठिकाणी एक तरुणी रोज नंदनवनातल्या मूक झर्‌याचं पाणी भरून नेण्याचं काम करीत असे. (मूक अशासाठी की कामसूंच्या नंदनवनातला झराही खळखळाटाद्वारे वाया जात असलेली उर्जा वाचवत असे. आता बोला!)

नवथर तारूण्याने बहरलेल्या या मुलीचं चालणं इतकं डौलदार आणि चपळ की जणू कुशल कलाकाराची वीणेवरून नजाकतीनं फिरणारी नाजुक बोटं. चंचलपणात तिला हार न जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे सदा न कदा कपाळावर येणारी तिच्याच केसांची बटवेलांटी.

आजही ती आपल्याच नादात घडा भरुन घेण्यासाठी आली. त्याचवेळी तोही तेथे रेंगाळत होता. पाणी भरताना तिची नजर अभावितपणेच त्याच्याकडे गेली. एखाद्या राजकन्येची दारी आलेल्या याचकाकडे जावी तशी.

“ओहो, तुझ्याकडे काही काम नाहीये का?” तिनं विचारलं.

“काम? कामात वाया घालवायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये” तो उत्तरला.

पण तिला काही त्याच्या बोलण्याचा अर्थ लागला नाही. ती म्हणाली, “तुला हवं असल्यास मी तुला काही काम देईन”

“मूक निर्झराच्या देवते, गेले काही क्षण मी तुझ्याकडून काहीतरी मागावं असाच विचार करतोय”, तो उत्तरला.

“कसलं काम हवंय तुला?” तिनं विचारलं.

“तुझ्या घागरींतली एक मला हवी आहे” तो म्हणाला.

“तुला यातून पाणी काढायचंय का?”

“नाही. मला त्यावर चित्र काढायचंय”

“चित्र? हू” नाक फेंदारून ती म्हणाली, “असल्या रिकामटेकड्या गोष्टींसाठी माझ्याकडे मुळीच वेळ नाहीये”

असं म्हणून ती घागरी उचलून चालू लागली.

पण त्यानं तिचा पिच्छा सोडला नाही. त्यानंतर रोज जेव्हा ती झर्‌याचं पाणी भरायला येई तेव्हा हा रोज तिची मनधरणी करत असे. चित्र काढायला घागर मागत असे.

अखेर एक दिवस तिचं मन द्रवलं आणि तिनं आपली एक घागर त्याला दिली.

तो चित्र काढू लागला. लयदार रेषा आणि विलोभनीय रंगांच्‍या मेळातून त्याने ती घागर सजवली, देखणी बनवली. चित्र पूर्ण करून त्याने जेव्हा घागर तिला परत केली, तेव्हा ती पाहातच राहिली. घागर तोंडासमोर धरून चित्र पुन्हा-पुन्हा निरखत राहिली. डोळ्यात कोडं पडल्याचे भाव. भुवयांची धनुकली जास्तच वाकल्यासारखी.

“या रंगरेषांचा अर्थ काय रे? त्यांचा नेमका उपयोग काय?” तिनं त्याला विचारलं.

त्याला हसू आलं.

“शून्य. चित्राला अर्थ, हेतू असतोच असं नाही.” तो म्हणाला.

घागर घेउन ती घरी आली. घरच्यांच्या नजरा चुकवून दिव्याच्या प्रकाशात तीवरची कलाकुसर न्याहाळत राहिली. पुन्हा पुन्हा. प्रत्येक बाजुने. उलटसुलट. त्या रात्री तिला झोप लागेना. अंथरुणातून उठून तिने दिवा लावला आणि रात्रीच्या नीरव शांततेत घागरीवरची कलाकुसर पुन्हा न्याहाळली. आयुष्यात प्रथमच तिने निरर्थक, निर्हेतुक असं काहीतरी पाहिलं होतं.

दुसर्‌या दिवशी ती जेव्हा घागरी घेउन पाणी भरण्यासाठी निर्झराकडे निघाली तेव्हा तिची पावलं नेहमीच्या घाईनं पडत नव्हती. तिच्या मनातही एक विलक्षण नवी जाणीव भरून राहिली होती. जिला ना हेतू होता, ना अर्थ.

आजही तो तिथं उभा होता.
गोंधळून तिनं विचारलं, “आज तुला काय हवंय?”
“काही नाही. आणखी थोडंसं काम” तो म्हणाला.
“कोणतं काम आवडेल तुला?”
“तुझ्या केसांसाठी एक रंगीबेरंगी रिबिन तयार करावी म्हणतो” तो म्हणाला.
“कशासाठी?”
“असंच”

आणि त्याने रिबिनी बनवल्याही. सुंदर, रंगारंग. आता तिचा रोजचा बराचसा वेळ त्या सुंदर रिबिनी केसांत बांधण्यात जाउ लागला. बरीचशी मिनिटं निरर्थक वाया जाउ लागली. बरंचसं काम शिल्लक राहू लागलं.

हळूहळू कामसूंच्या नंदनवनातल्या बर्‌याचशा लोकांची कामं तुंबून राहू लागली. प्रत्येकाचा थोडाफार वेळ चित्रं काढणे, शिल्प घडवणे अशा निरर्थक गोष्टींत वाया जाउ लागला.

नंदनवनाचे श्रेष्ठी चिंताक्रांत बनली. कामांवर फारच परिणाम होउ लागला होता. नंदनवनाच्या इतिहासात आजवर असं कधी घडलं नव्हतं. तातडीची सभा बोलावण्यात आली.

देवदूताने घाईतच सभेत प्रवेश केला, श्रेष्ठींना मुजरा केला आणि आपली चूक कबुल केली.

“क्षमस्व. मी चुकीच्या माणसाला नंदनवनात आणलं”, तो म्हणाला, “या सार्‌याला तोच जबाबदार आहे.”

त्याला बोलावणं धाडण्यात आलं.

शांतपणे त्याने सभेत प्रवेश केला. सभेनं त्याच्याकडे पाहिलं. कलाकाराला साजेसा वेष, हातात निरनिराळे कुंचले, रंगांच्या वड्या, कपड्यांना रंगांचे डाग… पाहता क्षणीच त्यांना समजलं. हा मनुष्य नंदनवनात राहण्यास योग्य नाही.

“या ठिकाणी तुमच्या सारख्या लोकांना स्थान नाही. ताबडतोब चालते व्हा” अध्यक्षांनी कठोर स्वरात आज्ञा सोडली.

त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला, आपले कुंचले आणि रंग गोळा केले आणि सभेतून निघाला. जाण्यासाठी वळणार इतक्यात त्याच्या कानावर शब्द ओले.
“थांब, मलाही तुझ्यासोबत यायचंय”
मुक्या निर्झरावर पाणी भरणारी ती. तिचाच आवाज होता तो.

सारी सभा विस्मयचकित झाली. नंदनवनात अशी घटना कधीही घडली नव्हती. एक निर्हेतुक आणि निरर्थक घटना.

- (गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या A Wrong Man in Workers Paradise चे भाषांतर)

Published in: on जुलै 1, 2009 at 5:06 pm Comments (3)

गर्वहरण

घ्रर्रर्र….
नदीकिनार्‌याच्या शांत वातावरणाला चिरत तो आवाज आसमंतात भरला. आसपासच्या झाडाझुडपांवरची पाखरं कावरी बावरी होत उडाली. नदीकाठाने मॉर्निंग वॉकला जाणार्‌यांचे चेहरे त्रासिक बनले. नेहमीच्या चिवचिवाटाची जागा यांत्रिक थडथडाटाने घेतली. मातीचा धुरळा उडून धुकं धुकं झालं. भले मोठे जेसीबी नदीकाठच्या उंचसखल जमिनीला एकसारखे करण्याच्या कामाला जुंपले. नदीच्या ओंजळभर पाण्यातही तगून राहिलेले मासे भेदरून तळातल्या कपारींच्या आश्रयाला गेले. पाण्यावर धुळीचं बारिकसा तांबडा-पांढरा थर साचू लागला. सावळ्या चेहर्‌याच्या बाईनं तोंडभर पावडर थापून घ्यावी, तसा नदीचा चेहरा विचित्र दिसू लागला.
नदीचा प्रवाह मात्र नेहमीच्याच शांत आणि संथपणाने वाहत होता. काठावर आज झालेल्या बदलांची नोंद त्याने घेतली होती की नाही, कोण जाणे.

शहराच्या मध्यभागातून वाहणारी नदी म्हणजे पुरुषांच्या कळपात हरवलेली बाई. दाही दिशांनी जिभल्या चाटत अंगावर येवू पाहणार्‌या इमारती, झोपडपटृटया, रस्ते, गटारं. त्यातूनही उरलीसुरली अब्रु सांभाळत वाट फुटेल तशी आपला मार्ग आक्रमणारी ती. नदी. आजही काठावर दाटीवाटीनं गर्दी करुन असलेल्या उंच इमारतींनी तिच्याकडे तुच्छतेने पाहिलं. पलिकडचे रस्ते दात विचकून हसले. गटारं घाण ओकू लागली. त्यात भर म्हणून ही जेसीबी यंत्रं. सौंदर्यवतीचा केशसंभार वस्तर्‌यानं भादरून तुळतुळीत गोटा करावा, तसा तो हिरवाईनं लगडलेला नदीकाठ जेसीबीच्या धारेखाली निर्जीव, सरधोपट आकार धारण करु लागला.

एकेकाळी हीच नदी शहरातलं मुख्य सौंदर्यस्थळ होती. घरात एकुलती एक पोर असली, की तिचं जसं कोडकौतुक होतं, तसंच हिचंही होत असे. दोन्ही तिरांवर पसरलेली हिरवाई म्हणजे या पोरीच्या खांद्यावर बागडणार्‌या दोन वेण्याच. सकाळ-संध्याकाळ नदीकाठचा आसमंत पाखरांच्या किलबिलाटाने किणकिणायचा. सुटीच्या दिवशी लेकुरवाळी कुटुंबं, नवथर तरुण जोडपी नदीच्या काठी विरंगुळ्याला यायची. चार घटका निवांत घालवायची. नदीच्या वाहत्या पाण्याचा खळखळाट तेव्हा अधिकच बोलका व्हायचा.

पण अचानक सारंच बदललं. नदीकाठाला लागून पहिली इमारत उभी राहिली, तेव्हाही नदीचा प्रवाह नेहमीच्याच शांत आणि संथपणाने वाहत होता. काठावर झालेल्या बदलांची नोंद त्याने घेतली होती की नाही, कोण जाणे. याच शांतपणाचा फायदा दोन पायांच्या श्वापदानं घेतला. नंदनवनात रोगट तण माजावं, तसं इमारतींचं रान नदीच्या आसपास माजू लागलं. डांबराचे साप विषारी फुत्कार टाकत तिच्याभोवती पाश आवळू लागले. सुदृढ शरीरात रोगट रक्त शिरावं, तशी गटारं नदीच्या सात्विक सौंदर्याला भ्रष्ट करण्याच्या इर्ष्येने तिच्या शरीराला लुचू लागली. पण तणातल्या तुळशीसारखी नदी मात्र या सार्‌यांतून वाट काढत वाहत राहिली. अशक्त्त बनली पण साहत राहिली. काठावरचे इमले कुचेष्टेने तिची टर उडवत राहिले.

आज मात्र अखेरचा घाव पडला. अक्राळविक्राळ यंत्रानं तिच्या अब्रुवरच घाला घातला. डोहात आतल्या आत खळबळ माजली. पण तीरावरुन कुचेष्टेनं तिच्याकडे पाहणार्‌या इमल्यांना नदीचा प्रवाह आजही शांत आणि संथच वाटत होता.

आपल्या नशिबावर रडावं की माणसाच्या करंटेपणावर हसावं नदीला कळेना. डोहातल्या कपारीत घुमणारे हुंदके तिला असह्य झाले. दात विचकून हसणार्‌या इमल्यांचा आवाज कानातून मळ काढून फेकावा तसा तिनं फेकायचा प्रयत्न केला. उगमापासून अंतापर्यंत अंगात साठलेला संताप उसळ्या मारु लागला. शहराबाहेरच्या धरणाच्या कुंपणावर नदीचं पाणी धडका देउ लागलं.

अशातच कृष्णानं द्रौपदीला वस्त्र पुरवावं तशा पावसाच्या धारा जमिनीवर कोसळू लागल्या, रानावनातून, रस्ते-गल्ल्यांतून, गटारा-नाल्यांतून पाणी नदीला येवून मिळू  लागलं. तसा प्रवाहाचा जोर वाढला. वाढतच राहिला.

हजारोंच्या संख्येनं सैन्य शत्रूवर चालून जावं, तसे पाणी वाट फुटेल तसं शहरात शिरु लागलं. डांबराचे साप प्रवाहात वाहून गेले. मगरीच्या शेपटीच्या फटकार्‌याने पाठीचा मणका मोडावा, तशा प्रवाहाच्या फटकार्‌यांनी कच्ची घरं मोडून पडली. भिंती वाहून गेल्या. पण प्रवाहाला उसंत नव्हती, त्याचं तांडव आता तर कुठे सुरू झालं होतं. साताजन्माच्या भुकेल्या अजगराने दिसेल तो प्राणी गिळंकृत करावा, तसा पाण्याने नदीकाठ गिळंकृत करुन टाकला. पोट फुगलेल्या अजगरासारखी नदी दिसू लागली. तरी पाण्याला उसंत नव्हती. काठावरचे इमले पत्त्याच्या बंगल्यासारखे प्रवाहाच्या आवर्तात कोसळले, होते नव्हते झाले. तरी पाण्याची भूक शमण्याची चिन्हे नव्हती. पाणी शहरात शिरु लागलं. सहस्र हातांनी शहराला आवळू लागलं. नदी कात टाकल्यासारखी दिसू लागली.

युगायुगांच्या क्रोधाची आग ओकत साक्षात कालीनं तांडव करावं, तशी नदी अस्ताव्यस्त पसरली. दिवसभर शहराच्या छाताडावर बेभान तांडव करत फिरली.

…अखेर पात्रातल्या डोहाचा तळ पूर्ववत शांत झाला. भानावर येत असलेल्या नदीने काठावरच्या उदृध्वस्त इमल्यांकडे नजर टाकली. गलितगात्र होवून ते मोडून पडले होते. डांबराचे साप छिन्नविछिन्न झाले होते. अवघं शहर मरणासन्न झालं होतं. एरवी गर्वाने ताठ असलेली शहराची मान मोडून पडली होती…

…नदीचा प्रवाह आता पुन्हा नेहमीच्याच शांत आणि संथपणाने वाहू लागला होता.

- अमोल कपोले

Published in: on जून 30, 2009 at 1:01 pm Comments (5)

झोळी

पहाडाच्या पायथ्याशी
मैतरीचं रान दाट
अंगओल्या तृणासवे
तुझी माझी गळाभेट

वाट चढणीची होते
तुझ्या गाण्याची लकेर
थेंबाथेंबात भेटतो
पित्यासम तुझा सूर

तुझ्या खटयाळ सरींशी
दवाड वारृयाशी सलगी
धुकाळला घाटमाथा
आभाळाअंगी बिलगी

माथ्यावरच्या राउळी
एक ज्योत फडफडे
तुझ्या पाउलांना घाली
माती मायेचे साकडे

वर शिखर संन्यासी
अवघे अस्तित्व न्याहाळी
दान तुझं उधळून
अक्षयली त्याची झोळी!

- अमोल कपोले

Published in: on जून 27, 2009 at 11:09 pm Leave a Comment

सरडा

dollsofindia.com वरून साभार.

dollsofindia.com वरून साभार.

टिंगलवाडीच्या रामराव पाटलांना फिटनेसचा भलता नाद. त्यामुळे रोज सकाळी हणम्यासोबत ‘मार्निंग वाक’ ला जाणे हा त्यांचा नित्यक्रम. आजही ते फिरायला निघाले, सकाळी सातची वेळ म्हणजे गावाची जाग येण्याची वेळ. त्यामुळे गावाचे सगळे व्यवहार अगदी शांततेत चाललेले असण्याची वेळ. पण, आज त्या शांततेवर चरे उमटले. चावडी क्रॉस करून जात असतानाच हणम्या आणि पाटलांच्या कानावर एकच कल्लोळ आला,
”हाणा, मारा त्या कुत्र्याला, मायला चावून पळतंय”
आवाजाच्या दिशेने वळून पाहता दोघांनाही एक मजेशीर दृश्य दिसलं. एक छोटं कुत्र्याचं पिल्लू केकाटत पळत होतं आणि सात-आठ जण त्याच्या मागे धावत होते, त्याला मारण्यासाठी. अखेर या शर्यतीत ते बिचारं जनावर हरलं आणि त्या लोकांनी त्याला पकडलंच. आपली एंट्री मारायची वेळ आताच आहे, हे जाणून पाटलांनी गर्दीच्या दिशेनं कूच केली. हणम्या पण बाह्या सरसावत पुढे सरकला.
“का रं, काय गोंधळ हाये”

पाटलांना बघून गर्दी चपापली आणि त्यांनी पाटलांना वाट करून दिली.घोळक्याच्या मध्यभागी जनू न्हावी एक हात वर करून तावातावाने त्या कुत्र्याला शिव्या घालत होता.

पाटलांना पाहताच त्याचा स्वर खाली आला, विस्कटलेले केस आणि कपडे सावरत तो म्हणाला,
“हृये बेणं कुत्र्याचं पिल्लू. चावलं की हो पाटील माझ्या हाताला. आता माझा कामाचा हात मी धरून बसलो आठ दिवस तर खानार काय?”
जन्याच्या उजव्या हाताची तीन बोटं रक्ताळली होती. कुत्र्यानं चांगलाच कडाडून चावा घेतला होता.
हं.. पाटलांनी मिशीवरून हात फिरवत आधी जन्याची बोटं बघितली आणि मग त्या कुत्र्याकडे नजर टाकली.
झाल्या प्रकाराने भेदरलेलं ते पिल्लू थरथर कापत जागीच उभं होतं, त्याच्या भेदरलेल्या नजरेत एकाच वेळी भीती आणि याचना असे भाव भरलेले होते.
“च्या मायला. कोनाचं पिल्लू हाय हे. कुत्री पाळतात तर सांभाळता येत नाही का लोकांना.. याचा बंदोबस्त आता केलाच पायजे.”
“व्हय व्हय.. ” गर्दीनेही पाटलांच्या स्वरात आपला स्वर मिसळला.

पाटील पुढे काहीतरी बोलणार एवढयात हणम्या म्हणाला, “पन पाटील, मला वाटतंय, ह्ये कुत्रं आपल्या आमदार सायबाचं हाये. त्यांच्याकडे आसं एक कुत्रं हाये आसं मी आइकलं होतं.”

पाटलांची फुगलेली छाती एकदम दोन इंच कमी झाली,

“काय सांगतूस, आमदार गुलाबरावाचं कुत्रं हाये हे..”
“व्हय..माला बी तसंच वाटतंय.. ” गर्दीतून एक स्वर बोलला.

पाटलाच्या चेहर्‍यावरचा रूबाब नाहिसा झाला. मिशांचे पीळ लुळे पडले. नजरेतले कुत्र्याविषयीचे तुच्छतेचे भाव आणि जन्याविषयीचे सहानुभूतीचे भाव यांची अदलाबदल झाली. कुत्र्याकडे दयार्द्र नजरेनं पाहत पाटील म्हणाले,

“जन्या लेका, सायबाचं कुत्रं असं उगा कुनाच्या वाटाला जानार न्हाय. तूच कायतरी खोड काडली असशील..”
“आता मी काय खोड काडनार त्याची पाटील.. आन हे कुत्रं आमदाराचं न्हाय..त्येच्याकडं असं कुत्रच न्हाय.. “जन्या उत्तरला.

एवढात हणम्या कसलीशी आठवण झाल्यागत म्हणाला, “पाटील, माला बी जरा डाउट वाटतोय. परवा मी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो नव्हं का, तवा तं काय दिसलं नाय बा मला.”
“व्हय व्हय, आमदाराकडं आसं कुत्रं नाय हाय,” गर्दीतला आणखी एक स्वर बोलला.

पाटलाच्या चेहर्‍यावरचे भाव पुन्हा बदलले, “हानम्या खरं बोलतूस?”
हणम्यानंही मान हलवली, “एकदम खरं पाटील.”
पाटलाच्या चेहर्‍यावरचे लाचार भाव एकदम नाहीसे झाले, मुद्रेवर पुन्हा रूबाब झळकायला लागला. पुन्हा एकदा कुत्रा आणि जन्याविषयीच्या भावनांची अदला बदल झाली.

“या कुत्र्याचा मालक कोन हाय, त्याचा शोध घेउन त्याला ताबडतोब दम द्यायला पायजे.”

“व्हय व्हय.. ” गर्दीने नेहमीप्रमाणे री ओढली.

“हनमंतराव.. कुत्र्याच्या मालकाचा शोध घेवून संध्याकाळी चावडीवर बोलवा..” पाटील मिशांना पीळ भरत बोलले.
“नाय नाय पाटील.. हे आमदारांचंच कुत्रं हाय..” गर्दीतून आणखी एक स्वर पचकला.

मिशीला पीळ भरता भरता पाटील पुन्हा दचकले,
“हनम्या, काय म्हनतोय तो.”

पण हणम्यानं उत्तर देण्याआधीच आणखी एक स्वर उत्तरला, “आवं पाटील, हे आमदाराचंच कुत्र हाये. या जन्याला खोड काडायची लय खाज… म्हनून त्यानं पेटती विडी कुत्र्याच्या तोंडात दिली, मग चावनार नाय तर काय?”

पाटलाच्या मिशा पुन्हा लुळ्या पडल्या.. पुन्हा कुत्रा आणि जन्याविषयीचे भाव बदलले.

“तरी मी म्हनत होतो हनम्या.. कुत्रं खानदानी दिसतंय, आसं एकदम कुनाला चावनार्‍यातलं वाटत नाही. काय रं जन्या.. हे आसले उद्योग करतूस आन त्या बिचार्‍या मुक्या प्रान्याला दोष देतोस व्हय रं.. आता लेका तुझाच बंदोबस्त करायला पायजे…”
“व्हय व्हय.. ” गर्दीने आपला धर्म पाळला.

“थांबा पाटील.. ” छगन सुताराचा पोरगा पुढे होत बोलला.
“नाय म्हन्जे मला वाटतं हे कुत्रं आमदाराचं न्हाई. म्या तरी कदी त्याला पाह्यलं नाही..”

“व्हय व्हय.. ” आणखी एक दोघांनी या नव्या माहितीला दुजोरा दिला.

पाटलांची मुद्रा पुन्हा बदलली. पुन्हा मिशा ताठ. कुत्रा आणि जन्याविषयीच्या भूमिकांत बदल.

आता ते काही बोलणार इतक्यात हणम्या म्हणाला, “माला वाटतं पाटील आपन माहितगार मानसाकडूनच खात्री करून घेऊ. तो समोरून नाम्या येतोय, आमदारांचा हरकाम्या. त्यालाच इचारू.”
“ह्ये कुत्रं आमदाराचं नाय, आमदाराकडे आसं कोन्चबी कुत्रं न्हाय..” नाम्यानं सगळ्या संशयांना पूर्णविराम दिला.
पाटलांची मुद्रा.. मिशा… जन्या.. पिल्लू.. अदलाबदल.
“तरी मी म्हनत होतो, ह्ये कुत्रं मोकाट कुत्रं असनार, कुठं तो आमदाराचा खानदानी आब आन कुठं ह्ये मरतुकडं कुत्रं.. त्याला आता मुन्शिपाल्टीच्या मान्सांच्याच ताब्यात द्यायला पायजे, ” इति पाटील.

“नाय पन.. जन्या बोलला, ह्ये कुत्रं आमदाराचं न्हाई आसं मी म्हनालो, पन ते आमदाराच्या भावाचं हाये. परवाच त्यांनी शहरातून आन्लं त्येला..”
पाटलांची मुद्रा.. मिशा… जन्या.. पिल्लू.. अदलाबदल.

“तरी मी म्हनतच होतो हनम्याला.. हे पिल्लू अगदी शहरी वळनाचं हाये, आसं एकदम कोनाला चावनारं न्हाय, ह्या जन्यानंच त्येची खोड काडली. कारं ए जन्या आता काय करावं तुला, बिचार्‍या मुक्या प्रान्याला तरास दिला.. चल आन आता ते पिल्लू इकडं..” , इति पाटील.

आता गर्दीतूनही जन्याविषयी कुचेष्टेचा स्वर उमटला. त्याची चेष्टा करत सारे पांगले. नाम्यानं पिल्लू उचललं आणि तो आमदाराच्या बंगल्याकडे रवाना झाला.

मिशांवर ताव देत, ताठ मानेनं पाटील हणम्यासोबत वाडयाच्या दिशेने चालू लागले..

(अंतोन चेकॉव्हच्या ‘दी शॅमेलिऑन’चे स्वैर रूपांतर)

Published in: on जून 26, 2009 at 11:11 am Leave a Comment