घ्रर्रर्र….
नदीकिनार्याच्या शांत वातावरणाला चिरत तो आवाज आसमंतात भरला. आसपासच्या झाडाझुडपांवरची पाखरं कावरी बावरी होत उडाली. नदीकाठाने मॉर्निंग वॉकला जाणार्यांचे चेहरे त्रासिक बनले. नेहमीच्या चिवचिवाटाची जागा यांत्रिक थडथडाटाने घेतली. मातीचा धुरळा उडून धुकं धुकं झालं. भले मोठे जेसीबी नदीकाठच्या उंचसखल जमिनीला एकसारखे करण्याच्या कामाला जुंपले. नदीच्या ओंजळभर पाण्यातही तगून राहिलेले मासे भेदरून तळातल्या कपारींच्या आश्रयाला गेले. पाण्यावर धुळीचं बारिकसा तांबडा-पांढरा थर साचू लागला. सावळ्या चेहर्याच्या बाईनं तोंडभर पावडर थापून घ्यावी, तसा नदीचा चेहरा विचित्र दिसू लागला.
नदीचा प्रवाह मात्र नेहमीच्याच शांत आणि संथपणाने वाहत होता. काठावर आज झालेल्या बदलांची नोंद त्याने घेतली होती की नाही, कोण जाणे.
शहराच्या मध्यभागातून वाहणारी नदी म्हणजे पुरुषांच्या कळपात हरवलेली बाई. दाही दिशांनी जिभल्या चाटत अंगावर येवू पाहणार्या इमारती, झोपडपटृटया, रस्ते, गटारं. त्यातूनही उरलीसुरली अब्रु सांभाळत वाट फुटेल तशी आपला मार्ग आक्रमणारी ती. नदी. आजही काठावर दाटीवाटीनं गर्दी करुन असलेल्या उंच इमारतींनी तिच्याकडे तुच्छतेने पाहिलं. पलिकडचे रस्ते दात विचकून हसले. गटारं घाण ओकू लागली. त्यात भर म्हणून ही जेसीबी यंत्रं. सौंदर्यवतीचा केशसंभार वस्तर्यानं भादरून तुळतुळीत गोटा करावा, तसा तो हिरवाईनं लगडलेला नदीकाठ जेसीबीच्या धारेखाली निर्जीव, सरधोपट आकार धारण करु लागला.
एकेकाळी हीच नदी शहरातलं मुख्य सौंदर्यस्थळ होती. घरात एकुलती एक पोर असली, की तिचं जसं कोडकौतुक होतं, तसंच हिचंही होत असे. दोन्ही तिरांवर पसरलेली हिरवाई म्हणजे या पोरीच्या खांद्यावर बागडणार्या दोन वेण्याच. सकाळ-संध्याकाळ नदीकाठचा आसमंत पाखरांच्या किलबिलाटाने किणकिणायचा. सुटीच्या दिवशी लेकुरवाळी कुटुंबं, नवथर तरुण जोडपी नदीच्या काठी विरंगुळ्याला यायची. चार घटका निवांत घालवायची. नदीच्या वाहत्या पाण्याचा खळखळाट तेव्हा अधिकच बोलका व्हायचा.
पण अचानक सारंच बदललं. नदीकाठाला लागून पहिली इमारत उभी राहिली, तेव्हाही नदीचा प्रवाह नेहमीच्याच शांत आणि संथपणाने वाहत होता. काठावर झालेल्या बदलांची नोंद त्याने घेतली होती की नाही, कोण जाणे. याच शांतपणाचा फायदा दोन पायांच्या श्वापदानं घेतला. नंदनवनात रोगट तण माजावं, तसं इमारतींचं रान नदीच्या आसपास माजू लागलं. डांबराचे साप विषारी फुत्कार टाकत तिच्याभोवती पाश आवळू लागले. सुदृढ शरीरात रोगट रक्त शिरावं, तशी गटारं नदीच्या सात्विक सौंदर्याला भ्रष्ट करण्याच्या इर्ष्येने तिच्या शरीराला लुचू लागली. पण तणातल्या तुळशीसारखी नदी मात्र या सार्यांतून वाट काढत वाहत राहिली. अशक्त्त बनली पण साहत राहिली. काठावरचे इमले कुचेष्टेने तिची टर उडवत राहिले.
आज मात्र अखेरचा घाव पडला. अक्राळविक्राळ यंत्रानं तिच्या अब्रुवरच घाला घातला. डोहात आतल्या आत खळबळ माजली. पण तीरावरुन कुचेष्टेनं तिच्याकडे पाहणार्या इमल्यांना नदीचा प्रवाह आजही शांत आणि संथच वाटत होता.
आपल्या नशिबावर रडावं की माणसाच्या करंटेपणावर हसावं नदीला कळेना. डोहातल्या कपारीत घुमणारे हुंदके तिला असह्य झाले. दात विचकून हसणार्या इमल्यांचा आवाज कानातून मळ काढून फेकावा तसा तिनं फेकायचा प्रयत्न केला. उगमापासून अंतापर्यंत अंगात साठलेला संताप उसळ्या मारु लागला. शहराबाहेरच्या धरणाच्या कुंपणावर नदीचं पाणी धडका देउ लागलं.
अशातच कृष्णानं द्रौपदीला वस्त्र पुरवावं तशा पावसाच्या धारा जमिनीवर कोसळू लागल्या, रानावनातून, रस्ते-गल्ल्यांतून, गटारा-नाल्यांतून पाणी नदीला येवून मिळू लागलं. तसा प्रवाहाचा जोर वाढला. वाढतच राहिला.
हजारोंच्या संख्येनं सैन्य शत्रूवर चालून जावं, तसे पाणी वाट फुटेल तसं शहरात शिरु लागलं. डांबराचे साप प्रवाहात वाहून गेले. मगरीच्या शेपटीच्या फटकार्याने पाठीचा मणका मोडावा, तशा प्रवाहाच्या फटकार्यांनी कच्ची घरं मोडून पडली. भिंती वाहून गेल्या. पण प्रवाहाला उसंत नव्हती, त्याचं तांडव आता तर कुठे सुरू झालं होतं. साताजन्माच्या भुकेल्या अजगराने दिसेल तो प्राणी गिळंकृत करावा, तसा पाण्याने नदीकाठ गिळंकृत करुन टाकला. पोट फुगलेल्या अजगरासारखी नदी दिसू लागली. तरी पाण्याला उसंत नव्हती. काठावरचे इमले पत्त्याच्या बंगल्यासारखे प्रवाहाच्या आवर्तात कोसळले, होते नव्हते झाले. तरी पाण्याची भूक शमण्याची चिन्हे नव्हती. पाणी शहरात शिरु लागलं. सहस्र हातांनी शहराला आवळू लागलं. नदी कात टाकल्यासारखी दिसू लागली.
युगायुगांच्या क्रोधाची आग ओकत साक्षात कालीनं तांडव करावं, तशी नदी अस्ताव्यस्त पसरली. दिवसभर शहराच्या छाताडावर बेभान तांडव करत फिरली.
…अखेर पात्रातल्या डोहाचा तळ पूर्ववत शांत झाला. भानावर येत असलेल्या नदीने काठावरच्या उदृध्वस्त इमल्यांकडे नजर टाकली. गलितगात्र होवून ते मोडून पडले होते. डांबराचे साप छिन्नविछिन्न झाले होते. अवघं शहर मरणासन्न झालं होतं. एरवी गर्वाने ताठ असलेली शहराची मान मोडून पडली होती…
…नदीचा प्रवाह आता पुन्हा नेहमीच्याच शांत आणि संथपणाने वाहू लागला होता.
- अमोल कपोले
अमोल यांनी पोस्ट केले
अमोल यांनी पोस्ट केले 
अमोल यांनी पोस्ट केले
मित्रहो, जगात अनेक प्रकारचे मूर्ख आहेत, पण एकाच माणसाने अनेक प्रकारचा मुर्खपणा केलेला पाहिलाय का? मी त्या दुर्मिळ प्रजातीतला प्राणी आहे. आजवर मी सर्व प्रकारचा मूर्खपणा केला. शिक्षण अर्धवट सोडलं, वडिलांच्या पैशांची उधळपट्टी केली, जुगार खेळला, पैसा गमावला. आणि हे सर्व कमी पडलं म्हणून की काय, गुप्त खजिना शोधण्याच्या भानगडीत पडलो.







