
ताडोबाच्या माळावर यायचंय का ?
या प्रश्नामध्ये दचकण्यासारखं काय आहे ?
पण माझ्या प्रश्नावर रिक्षावाला दचकलाच.
”काही प्रॉब्लेम आहे का ?” मी विचारलं.
”नाय, प्रॉब्लेम तुम्हाला असायला पायजे.”
”म्हणजे ? मी नाही समजलो.”
घोर अज्ञानी माणसाकडे पहावं तशा दयार्द्र नजरेने रिक्षावाल्याने माझ्याकडे पाहिलं.
”माळावरच जायचंय का ?” त्याने विचारलं.
”माळाच्या अलिकडे मुतडक वाडी आहे, तिथेच सोडा.”
”बसा. पंधरा रुपये होतील.”
मी बसलो. रिक्षा धावू लागली. रात्र बरीच चढली होती.
”किती वाजलेत हो ?” मी रिक्षावाल्याला विचारलं.
”साडेअकरा झालेत.” आरशातून मला न्याहाळत रिक्षावाल्याने उत्तर दिलं.
मी बाहेर पाहू लागलो. शहराची सीमा ओलांडल्याने मोकळी वाटत असलेली हवा आता रिक्षावाल्याला झोंबू लागली होती. त्याने गळ्याभोवतीचा रुमाल कानावर ओढला. मला ते वातावरण नेहमीचंच होतं.
”इथं नवीन दिसताय?” अपेक्षित असलेला प्रश्न रिक्षावाल्याने टाकलाच.
”छे. गेले दीड वर्ष इथेच राहतोय.”
”मुतडकवाडीत?”
”हो, तिथं जवळच.”
”असं सांगा की राव.” रिक्षावाल्याच्या आवाजात मघापासून जाणवणारा तणाव आता सैलावल्याचं मला जाणवलं.
”ताडोबाच्या माळावर म्हटल्यावर मी जरा घाबरलोच बगा.”
मी काही बोलणार तेवढ्यात रिक्षा थांबली. वाडीच्या फाट्यावर एकाने हात दिला होता.
”वाडीला जायचंय” किडकिडीत शरीरयष्टीचा, विचित्र चेहऱ्याचा तो मनुष्य म्हणाला.
”बसा. दहा रुपये.”
मुख्य रस्ता सोडून रिक्षा आता शेतातल्या रस्त्यातून पुढे निघाली.
शेजारी बसलेला तो किडकिड्या माझ्याकडे पाहून दात विचकून हसला. मी मान वळवून बाहेर नजर टाकली.
अंधारात रस्त्याच्या कडेला असलेली झाडं चित्रविचित्र आकार धारण करत होती. मधुनच कोठेतरी शेतातल्या झोपडीत असलेल्या दिव्याचा प्रकाशमान ठिपका खुणावून अदृश्य होत होता. उन्हाळ्याच्या सुरुवातीचे दिवस आणि चांदणी रात्र असल्याने भोवतालची झाडं-झुडपं करड्या रंगात बुडवल्यासारखी दिसत होती. निःस्तब्ध शांततेत निर्मनुष्य रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षाच्या इंजिनाची घरघर वातावरणात भरून राहिली होती.
इतक्यात ते घडलं…….
काय घडतंय ते कळायला मला काही मिनिट लागले. नक्की कशामुळे कळेना, पण रिक्षावाल्याने करकचून ब्रेक दाबला आणि रिक्षा थांबली. तसा मी एकदम भानावर आलो.
”काय झालं, रिक्षा का थांबवली ?” मी प्रश्न केला.
रिक्षावाल्याने काही उत्तर दिलं नाही. मागे न वळताच तो भेदरलेल्या स्वरात म्हणाला, ”तो पासिंजर कुठं गेला?”
”कोण ?” मी विचारलं आणि माझ्या एकदम लक्षात आलं, फाट्यावर एक किडकिड्या मनुष्य रिक्षात
बसला होता. विचारांच्या नादात त्याचं अस्तित्वच मी विसरून गेलो होतो.
“हा काय माझ्या शेजारी” मी शेजारी नजर टाकत म्हणालो.
शेजारी कुणीच नव्हतं.
हा कुठं गेला ते पाहण्यासाठी उतरण्याच्या उद्देशाने मी बाहेर पाय टाकणार, इतक्यात रिक्षावाला ओरडला,
“सायेब, उतरू नका..”
“अरे पण तो कुठं गेला ते तर पाहायला हवं की नको”
“काय नको, तो पोहोचला बरोबर पाहिजे तिथं.”
“अरे, पण तूच तर म्हणालास ना, तो कुठे गेला म्हणून? मग हा काय प्रकार आहे ?”
असं म्हणून मी उतरलो आणि पाठीमागे नजर टाकली.
रस्त्यावर कुणाचा मागमूस नव्हता.
मी काही बोलणार तेवढ्यात रिक्षावाल्याने रिक्षा सुरु केली आणि तो ओरडतच म्हणाला, “पट्कन रिक्षात बसा, नाहीतर काय खरं नाही.”
मी रिक्षात बसलो. जिवाच्या आकांताने त्याने रिक्षा हाणली. मी काही विचारण्याचीही वाट न पाहता तो बोलू लागला.
“सायेब. वाचलो आपण. गडी रिक्षात बसला तेव्हाच मला डाऊट आला होता. ते रूपसिंग पाटलाचं भूत होतं”
“कशावरून ?” मी विचारलं.
“कशावरून म्हणजे काय, चालत्या रिक्षातून असा माणूस एकदम कसा नाहिसा होईल”
“ते भूत होतं हे तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण रूपसिंग पाटलाचं नव्हतं. रूपसिंग पाटील देखणा माणूस होता”
“द्येखन्या माणसांची भूतं कुरूप, किडकिडित नसतात कशावरून”
“नसतातच रे”
“तुमी बगितलंय का रूपसिंग पाटलाचं भूत?”
“तू तरी बघितलंयस का ?”
“त्याचं भूत बगितलं नसलं तरी त्याला मी एकदा ओझरता पाहिला होता जिवंतपणी, त्याच्या बरं का – द्येखना गडी, सहा फुट उंची, भरदार शरीर, राजबिंडं रूप हो”
“त्याचा अन ह्याचा काही ताळमेळ लागतोय का मग”
“नाय बा, पण मग हा गडी कोण होता?”
“बाप्पा मुरारी, त्याचा दोस्त. हूल देण्यात वस्ताद.”
“मायला, तुम्हाला बरीच माहिती दिसतेय त्याची. आपल्याला बरं काय केलं नाही त्याने.”
“तो काही करत नाही, त्याचं काम एवढंच”
“म्हण्जे?”
मी काही बोललो नाही.
रिक्षा मुतडकवाडीत शिरून माळाच्या दिशेने धावू लागली.
“तुम्हाला कुठे सोडू ?”
“ती टोकाची विहिर आहे ना, तिथे सोड, पुढे मी जाईन”
“एकटं जायला भीती नाय वाटत का?”
“मला सवय आहे”
वाडी संपून माळाचा रस्ता सुरू होतो, तिथेच ती विहिर होती. म्हटली तर वाडीजवळ, म्हटली तर लांब.
विहिर जवळ येऊ लागली, तसं मला बदल जाणवू लागला. एक हूरहूर मनात दाटायला लागली. बाहू
फुरफुरायला लागले, हात शिवशिवायला लागले. साताजन्माची भूक पोटात आगडोंब उसळवू लागली.
“इथं थांबव”
मंत्रावल्यासारखं रिक्षावाल्याने ब्रेक दाबून जागीच रिक्षा थांबवली.
उतरता उतरताच माझ्या इच्छा अनावर झाल्या.
——————————
रिक्षा थांबवून रिक्षावाल्यानं बाहेर पाहिलं.
पासिंजर खिशातून पैसे काढण्याच्या बेतात असताना त्याने नीट न्याहाळून पाहिलं.
सहा फुट उंची, देखणं रूप, भरदार शरीरयष्टी, आणि या देखणेपणाला न शोभणारं क्रूर हसू ओकणारे डोळे.
पुढ्च्याच क्षणी त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
- पण आता फार उशीर झाला होता.
- अमोल कपोले






जून 24, 2009 at 10:51 pm
awadala….
जुलै 9, 2009 at 3:03 pm
Ultimate story…zakkas !
Darna mana hai …!
Nana patekar aani Vivek type.
Mast jamali aahe.
जुलै 10, 2009 at 12:04 pm
धन्यवाद!