आजही!

आजही..
दिवसाच्या त्या क्षणांना
तुझाच गंध येतो
परसातल्या कळ्यांना
तुझा सुगंध येतो

आजही..
हृदयातल्या ऋतुंना
तुझा वसंत येतो
विरहार्त या स्वरांना
कोकीळ कंठ देतो

आजही..
घायाळ पैंजणांना
बेताल खंत देतो
पायातल्या स्मृतींना
तुझी पढंत देतो

आजही..
पातक तुझे करूनी
मी नीतिमंत होतो
श्रद्धा तुझ्याच ठायी
अर्पून संत होतो

आजही..
झरण्या तुझ्या प्रवाही
अश्रू उसंत घेतो
प्रीतीस भग्न माझ्या
कीर्ती दिगंत देतो!

- अमोल

गजरा

दिवसाने मिटले पंख
रात्रीच्या गर्द मिठीत
निद्रेचे डोळे उघडे
स्वप्नांचे थेंब दिठीत

नयनांत उतरुनी चंद्र
पापणीत माझ्या झुरतो
वीणेचा सूर दिवाणा
तारेस छेडूनी विरतो

विरहाच्या शय्येवरती
काळोख बदलतो कूस
प्रहरांच्या पाठीवरती
अश्रुंचे मुके नि:श्वास

तो नभी धुक्याचा धागा
मेघांचे शेले विणतो
ताऱ्यांच्या मागावरती
तेजाचे दोहे म्हणतो

ही पहाट फेडत जाते
तुझिया प्रीतीचे देणे
पूर्वेच्या वेशीवरती
किरणांचे धाडूनी मेणे

मग सरते रात्र विराणी
सूर्याच्या चुकवित नजरा
सोबतीस सोडून जाते
हा आठवणींचा गजरा !

- अमोल

अमृतस्वर

पाउस येता असेच होते
तुझ्यासाठी मन पिसेच होते

भरून येता घनात वादळ
तुझाच आठव मनात केवळ

अशी लकाके वीज नभावर
तुझ्या हसूचा भास..पळभर!

पाउस येता मन बावरते
सुसाटते, तुजसाठी धावते

पाउस होतो तुझीच चाहूल
सरीसरींतून तुझेच पाउल

पाउस गातो तुझेच गाणे
मनी छेडतो तुझे तराणे

पाउस सरतो मला भिजवूनी
ओढ तुझी तन्मनी रुजवूनी

सांग प्रिये, तू होशील ना सर
तशी लाघवी, तशीच सुंदर

अंगांगी जाशील ना भिनवूनी
तव श्वासांचे ते अमृतस्वर!

- अमोल

दृष्‍टांत (अखेर)

(देवळाची पायरी कधीही न चढणाऱ्या आपल्या नवऱ्याला आज नेहमीपेक्षा जास्त चढलेली आहे, असं समजून त्यांचं बोलणं फारसं मनावर न घेता सुभद्राबाईंनी तो विषय तेथेच संपवला.

रामरावांना मात्र त्या रात्री झोप आलीच नाही.)

दुसऱ्या दिवशी रामरावांची सकाळ भराभरा फोन फिरवण्यात गेली.
दुपारी जेवणानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मिटिंगा चालू होत्या. तलाठी, आर्किटेक्ट, प्लॅनर, इंजिनिअर.. चर्चा झडू लागल्या. रामरावांना आता झोपायची उसंत मिळेना. डोक्यात आलेली योजना प्रत्यक्षात येईपर्यंत आता ते थांबणार नव्हते. नदीकाठच्या दोन एकरांच्या तुकड्यावर संग्रामरांवांच्या नव्या बिझनेसची उभारणी सुरु झाली आणि सात-आठ महिन्यांतच काम पूर्णही झालं. दरम्यानच्या काळात रामरावांना झालेल्या आयतेश्वराच्या दृष्टांताची बातमी कर्णोपकर्णी होत गावभर, नव्हे तालुकाभर पसरली होती.
रामरावांना म्हणे आयतेश्वराचा दृष्टांत झाला, खरं का?
खरं का म्हणजे काय गड्या, नदीकाठी काम बी सुरु झालंय म्हणे.
अशा चर्चाही झडू लागल्या. अधूनमधून रामरावांच्या कानावरही पडू लागल्या.
सारं काही नियोजनानुसार होतंय हे पाहून रामराव मिशीतल्या मिशीत हसले.
अखेर तो दिवस उजाडला.
नदीकाठी आज सरकारी, निमसरकारी, राजकीय, सामाजिक वाहनांची मांदियाळीच दाटली.
त्यासोबत तालुक्यातले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि रामरावांची भावकीही.
नाही म्हटलं, तरी किमान पाच हजारांचा लवाजमा पाहून रामराव सुखावले. पेपरातल्या जाहिरातींनी काम चोख बजावलं होतं म्हणायचं.
परिसराला जत्रेचं स्वरुप आलं होतं. नदीकाठचा प्रसन्न परिसर मंत्रपठणाने दुमदुमून गेला. घंटानाद चहुदिशांना भरुन राहिला. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रथम वास्तुचं उद्‌घाटन करण्यात आलं.
आज लोकांनी प्रथमच त्या वास्तूत प्रवेश केला.
एकदम डिट्टो
प्रतिरुपच हो
काय बी फरक नाही बघा
अशा प्रतिक्रिया प्रत्येकाच्या तोंडातून उमटू लागल्या.
..आणि गाभाऱ्यातली मूर्ती पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली.
हुबेहूब आयतेश्वर.
देवा, तुझी लीला अगाध आहे. प्रत्येकजण भारावून गेला.
पालकमंत्र्यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि सभामंडपातल्या विश्वस्त मंडळाच्या बोर्डचंही अनावरण त्यांच्याच शुभहस्ते करण्यात आलं. अखेर प्रति-आयतेश्वराच्या उभारणीत प्रकल्पाला मंजुरीपासून आर्थिक अनुदान देण्याचं पुण्यकर्म त्यांच्याच आशीवार्दाने झालं होतं.
भारावलेल्या या वातावरणात सुभद्राबाईंच्या आनंदाला पारावार नव्हता.
आयतेश्वरानं त्यांची प्रार्थना ऐकली होती. संग्रामरावांनी नवी जबाबदारी स्वीकारण्याचं कबूल केलं होतं.
हाताला मळ नाही, पायाला मळ नाही. सगळं काही आयतेश्वर घडवून आणेल, हे आश्वासन आणि रामरावांचं नियोजन त्यांच्यासाठी पुरेसं होतं.
त्यामुळेच विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर संग्रामरावांचं नाव मोठ्या दिमाखात झळकत होतं.
गावभर रामरावांच्या देवभक्तीची आणि दृष्टांताची चर्चा होती.
प्रति आयतेश्वराची प्रसिद्धी आता दिवस रात्र वाढणारच होती.
भक्तांचा ओघ आणि त्यासोबत ओघानेच येणारी समृद्घीही.
सर्वांचीच इच्छा सफल झाली होती.

मेंढरांना नवा कळप मिळाला होता
आणि
गुरांना नवं कुरण.

प्रति-आयतेश्वराच्या गाभाऱ्यातला दिवा मात्र तेवढ्याच निर्मळपणे आणि तेजस्वीपणाने तेवत होता.

(समाप्त)

- अमोल

दृष्टांत (भाग२)

(…पण अनेकांना व्यावहारिक सल्ले देण्याची कला त्याच्याकडे होती, आणि त्या सल्ल्यांमुळे बऱ्याच जणांचा फायदाही झाला होता. रामरावांनाही. त्यामुळेच आज त्यांचे पाय पुन्हा गणा मास्तरकडे वळले होते.)

“यावं, यावं फुडारी. आज एकदम हिकडं कसं?”
किल्लीच्या टोकानं कान कोरत गणा मास्तरनं रामरावांचं स्वागत केलं. गाडीत बसण्याच्या बेतात असलेला गणा मास्तर रामरावांना येताना बघून थांबला होता.
“काय मास्तर, दौऱ्यावर का?” रामरावांनी प्रतिप्रश्न केला.
“आयतेश्वराला चाललो होतो. गुरुवारचा नेम आहे आमचा. देवधर्मावर तुमची श्रद्धा नाही ते ठाउक आहे, पण तरी विचारतो, येताय का?”
नको, असं रामरावांच्या अगदी जिभेवर आलं होतं. ते निकरानं टाळत त्यांनी प्रतिप्रश्न केला.
“म्हंजे तुम्हाला परतायला रात होणार?”
“नउ तरी वाजतीलच बघा”
“अस्सं..” कानाची पाळी खाजवत रामराव बोलले, “मग चला तर.. आम्ही बी येतो. बघु तरी तुमचा आयतेश्वर काय म्हणतोय.”
गाडी रस्त्याला लागली तशी रामरावांनी मुद्यालाच हात घातला.
“मास्तर, ह्या संग्रामरावांनी पार वैताग आणलाय बघा आम्हाला. कशी ह्याची गाडी रुळाला लागनार काही कळंना झालंय बघा.”
“पुढारी, तुम्ही आयतेश्वराला यायला तयार झालात तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. संग्रामरावांचं प्रकरण दिसतंय.”
“काय सांगू मास्तर. आपलेच दात आन आपलेच ओठ. पोरगं तिशीला टेकल आता. पन अजून हात पाय हलवायची इच्छा नाही. आमची पुण्याई किती दिवस पुरणार?”
“बरोबर आहे पुढारी. तुम्ही त्याचं लग्न का लावून देत नाही? अंगावर जबाबदारी पडली, की लागेल लायनीला.”
“लगीन काय, मी उद्या बी लावून देईन हो. पोरींचे बाप डोळा ठेवून आहेत आमच्यावर. पण लग्नानंतरही याने काय केलं नाही, तर आमची अब्रू ती काय ऱ्हायली मास्तर.”
गणा मास्तरनं एक नि:श्वास सोडला.
“तुमच्या या समश्येवर आमच्याकडं बी काय उपाय नाही बघा पुढारी. आता काय गाऱ्हाणं मांडायचं ते आयतेश्वरापुढंच मांडा. तुम्हाला आवडणार नाही, पण माझं ऐका. ही वारी फुकट जाणार नाही.”
रामराव काहीच बोलले नाहीत. पोराच्या नाकर्तेपणाला आयतेश्वर काय करणार, असा प्रश्न त्यांच्या मनात आला.
तेवढ्यात आयतेश्वर आलंच.
गर्दीमुळे गाडी अलिकडेच पार्क करून मास्तर आणि रामराव मंदिराच्या दिशेनं निघाले.
निरिच्छेनंच दर्शनाला चाललेले रामराव आजूबाजूचं निरीक्षण करत चालले. पूजा-सामानाची, फुला-माळांची, आयतेश्वराचं लॉकेट, फोटो, अंगठी, चेन, शो-पीस, कॅसेट, सीडी अशा चीजवस्तूंच्या दुकानांची रांग दुतर्फा लागली होती. दोन-चार दुकानांत आयतेश्वराची कोणी “लोकल सुरेश वाडकरनं” गायलेली गाणी ढणाणा वाजत होती. चित्रपटाच्या गाण्यांच्या चालीवर आयतेश्वराची गाणी.. सारं काही आयतेश्वरमय होतं. गुरुवार असल्याने मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती. दर्शनाच्या रांगेत उभं असताना रामराव सारं काही टिपत होते.
साधा अभिषेक – 501 रु.
साग्रसंगीत अभिषेक – 1001 रु.
साद्यंत साग्रसंगीत अभिषेक – 5001 रु.
असा बोर्ड वाचून त्यांची करमणूक झाली.
आयतेश्वराची मूर्ती पाहून मात्र त्यांचा सगळा वैताग, शीणवटा पार पळून गेला. त्यांना प्रसन्न वाटू लागलं. मूर्तीपुढे नतमस्तक होवून परतताना कोपऱ्यात ठेवलेली भली मोठी दानपेटी त्यांच्या नजरेतून सुटली नाही.

रामराव घरी परतले ते एकदम खुशीत. रात्रीचं जेवण घेताना त्यांनी सुभद्राबाईंना पुन्हा-पुन्हा “संग्रामची गाडी आता कशी रुळाला लावतो पहाच”,असं सांगितलं.
“कशी ?” असं विचारल्यावर मात्र त्यांनी काही उत्तर दिलं नाही.
“मला दृष्टांत झालाय,” एवढंच ते उत्तरले.
देवळाची पायरी कधीही न चढणाऱ्या आपल्या नवऱ्याला आज नेहमीपेक्षा जास्त चढलेली आहे, असं समजून त्यांचं बोलणं फारसं मनावर न घेता सुभद्राबाईंनी तो विषय तेथेच संपवला.

रामरावांना मात्र त्या रात्री झोप आलीच नाही.

(क्रमश:)

दृष्टांत (भाग १)

रामरावांना जाग आली. झोप उडाली, तरी जवळपास पाच-सात मिनिटं ते पलंगावर तसेच पडून राहिले. आपण कोठे आहोत, हेच त्यांना कळेना. नजरेसमोर पांढरा शुभ्र रंग. आभाळ इतकं पांढरं फटक कसं? त्यांना प्रश्न पडला. इतक्यात त्या पांढऱ्या रंगात एक चक्र फिरायला लागलं.
आभाळाला पंखा?
रामरावांना आश्चर्याचा धक्काच बसला. तसे ते धडपडत उठले आणि क्षणार्धात भानावर आले.
“च्यायला, ही तर आपली बेडरूम आहे.”
रामराव स्वत:शीच म्हणाले. भर दुपारी आपण घेतली की काय.. छे, दिवसा घेणं आपल्या तत्वाला पटत नाही हे त्यांना लागलीच आठवलं. हल्ली पान-तंबाखू बंद केल्यामुळे तेही चढायचा प्रश्न नाही..
रामराव गोंधळात पडले. बसल्या बसल्या अंग झाडून त्यांनी आळस दिला. तेव्हा त्यांच्या आडदांड शरीरासोबत पलंगही गदागदा हलला. पलंगाच्या पायाशी ठेवलेला छोटा स्कूल त्यांच्या पायाच्या धक्क्याने बेडरूमच्या दुसऱ्या टोकाला फेकला गेला.
“नौबती झडल्या वाटतं. उठलात का? चहा टाकायला सांगते.”
सुभद्राबाई, म्हणजे रामरावांचं कुटुंब, किचनमधूनच बोलल्या.
चहाचं नाव काढताच रामरावांना फ्रेश वाटलं. मनात गोंधळाची उकळी फुटलेली होती. तिची वाफ दाबत ते बाथरुममध्ये शिरले. खळखळून आठ-दहा चुळा भरल्या. तोंडावर पाण्याचे पंधरा-वीस सपकारे मारले.
“छ्‌या, अजून फ्रेश वाटत नाही. ” चेहरा रुमालाने टिपत रामराव स्वत:शीच म्हणाले, “काय घोळ आहे कळत नाही.”
“घोळ कसला असणार,” चहाचा कप रामरावांपुढे ठेवत सुभद्राबाई बोलल्या, “माणसानं काही करायचंच नाही ठरवल्यावर आपण तरी किती कपाळ आपटून घ्यायचं दगडावर. आपलंच डोकं फुटायचं मेलं.”
रामरावांची अवस्था पुन्हा एकदा तुटलेल्या पतंगासारखी झाली.
“कोणाबद्दल बोलते आहेस तू ?” ते वैतागून म्हणाले.
“अहो असं काय करता. आपल्या संग्रामबद्दलच बोलणार ना मी.”
आता रामरावांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मघाचा पांढरा पडदा, आभाळातला पंखा, वैताग, हॅंग ओव्हर सगळ्याचे संदर्भ लागले. चहाच्या गरम घोटासोबत त्यांचा उरलासुरला गोंधळ पोटात ढकलला गेला.
“मायला, या संग्रामरावांचं काहीतरी करावंच लागेल.” ते मनाशीच म्हणाले.
उरलेला चहा एका घोटात संपवून ते तडक कपड करून बाहेर पडले. आज या प्रकरणाचा निकाल लावायचाच असा निश्चयच त्यांनी केला होता.
…………………………
राजकारण हा रामरावांचा पिढीजात “व्यवसाय”. त्यांच्या वडिलांनी ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली. रामरावांनी तालुक्याच्या राजकारणात जम बसवला. पोरगा निदान आमदारपदापर्यंत जावा, अशी त्यांची मनापासून इच्छा. पण संग्रामरावांच्या नावातला लढाउ बाणा अंगात काही उतरला नाही. दहावी-बारावीला खटपटी लटपटी करून रामरावांनी त्याला पास करून घेतला. पण स्वारी कॉलेजला अशी काही बिलगली की दहा वर्ष उलटूनही बाहेर पडायला तयार नाही. राजकारणाची सुरुवात कॉलेजपासून करेल या आशेने रामरावांनी त्याला कॉलेजच्या निवडणुकीत उभा करून पाहिला. सगळं मॅनेज करून निवडून आणला, पण पोरगा त्याचं माइलेज मिळवू शकला नाही. कॉलेजमध्ये त्याला स्वत:चा करिष्मा निर्माण करता आलाच नाही. रामरावांनी त्याला उद्योगालाही लावण्याचे प्रयत्न केले. दर सहा महिन्यांनी एक असे सहा धंदे सुरु केले. ते सहा दिवसही चालवता आले नाहीत. आपल्या नंतर या पोराचं काय होणार, हा घोर त्यांना आणि त्यांच्यापेक्षा सुभद्राबाईंना लागून होता. त्यामुळेच त्यांची सारखी चिडचिड व्हायची.
पण आज मात्र या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच, असं ठरवून रामराव निघाले ते तडक गणा मास्तरकडे आले. आता या गणा मास्तरचा आणि मास्तरकीचा काहीही संबंध नव्हता. पण अनेकांना व्यावहारिक सल्ले देण्याची कला त्याच्याकडे होती, आणि त्या सल्ल्यांमुळे बऱ्याच जणांचा फायदाही झाला होता. रामरावांनाही. त्यामुळेच आज त्यांचे पाय पुन्हा गणा मास्तरकडे वळले होते.

(क्रमश:)

पावसाला…

तुझं म्हणजे अगदी प्रियकरासारखं -
रुसलास की युगानुयुगं लपणार,
अन्
आलास की स्वत:ला विसरून कोसळणार!

आषाढरात्र

आषाढाची रात्र
पाझरते थेंबात
ओलेत्या चंद्राला
मेघांची सोबत

आषाढाची रात्र
मौनात बोलते
आकाशदेशीचे
गुपित खोलते

आषाढीच्या रात्री
जाणीवांचा जागर
घनगर्भ पापणीला
निद्रेचा भार

आषाढाची रात्र
नक्षत्र खुडते
पहाटची फुले
गगनात सोडते

आषाढाची रात्र
पावसात सरली
आसमंत भिजवून
गाभाऱ्यात उरली

- अमोल कपोले

उद्योगपती

पहाटेची 3 ची वेळ ही काही सहज म्हणून फिरायला जाण्याची वेळ नाही. पण शहर नवीन असेल, तुम्ही एकटे असाल, आणि एरिया हाय प्रोफाईल असेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोप येत नसेल, तर फिरायला जाण्यासाठी कोणतीही वेळ अयोग्य नाही. उलट अशा अनवट वेळाच बऱ्याचदा आपल्याला त्या शहराबद्दल दोन वेगळ्या गोष्टी सांगून जातात.
..आणि त्या दिवशी त्या दोन वेगळ्या नव्हे, दिग्मूढ करणाऱ्या गोष्टी समजणे माझ्या नशिबात होते. उतरलेल्या हॉटेलमधून बाहेर येऊन मी सरळ मुख्य रस्ता धरला. शहराच्या त्या भागात बहुतांश हॉटेलं आणि पब्ज, क्लब्जची रेलचेल असल्याने रात्रीचे दहा वाजल्यासारखा माहौल होता. चकाचक विदेशी बनावटीच्या गाडयांनी पार्किंग लॉट ओसंडून वाहत होते. त्या रंगीबेरंगी विश्वाचा नजारा न्याहाळत मी फुटपाथवरून रमत-गमत चाललो होतो, चालता-चालता मी पुढच्या मोठ्या चौकात आलो. आता चौक पास करून सरळ पुढे जावं की डावा अथवा उजवा रस्ता पकडावा की सरळ मागे फिस्न रूमवर जावं या विचारात असतानाच मला कुतूहल जागं करणारं ते दृश्य दिसलं.
चौकात रेंगाळलेल्या एका कारच्या खिडकीशी झुकून एक मनुष्य, भिकारीच असावा असं त्याच्या कपड्यांवर वाटत होतं, कारमधल्या मालकाच्या विनवण्या करत होता. अखेर मालकाने त्याच्या अंगावर शंभराची नोट भिरकावली आणि ती कार वेगाने रस्त्यावरच्या तुरळक वाहतुकीत अंतर्धान पावली.
एक सर्वसाधारण दृश्य. त्याची नोंद कळत-नकळत नोंद घेऊन मी पुढचा रस्ता धरणार होतो. पण, त्या भिकाऱ्याच्या नंतरच्या कृतीने माझी उत्सुकता चाळवली गेली. शंभराची नोट खिशात टाकून तो भिकारी चौकातून डावीकडे वळला, मात्र असं करताना त्याच्या देहबोलीत विलक्षण फरक पडला होता. मघाशी शरीराच्या प्रत्येक अवयवातून व्यक्त होणारी लाचारी अचानक लुप्त होऊन, त्यात एक प्रकारचा अपराईटनेस आला होता. त्या चालण्यात एक प्रकारचा सावधपणा आणि लगबग होती, त्याच्या लक्षात येणार नाही इतकं अंतर ठेवून मीही त्याच्यामागे चालू लागलो.

रस्त्यावरच्या एका अंधाऱ्या भागातून आता आम्ही जात होतो, भिकाऱ्याचं चालणं आता थोडं मंद झालं होतं, अखेर एका फारशी वर्दळ नसलेल्या अंधाऱ्या कोपऱ्यात तो थांबला. खांद्यावरची मळकट पिशवी त्याने खाली घेतली. घाईत त्यातून काहीतरी बाहेर काढलं.. कपडेच होते ते. झटपट त्याने अंगावरचे फाटके, मळकट कपडे उतरवले आणि पिशवीत कोंबले. पिशवीतले काढलेले कपडे अंगावर चढवले, स्वच्छ पांढराशुभ्र शर्ट आणि गडद निळी पॅंट. खिशातून कंगवा काढून त्याने अंदाजानेच स्वत:चे केस विंचरले. पिशवीतून नॅपकीन काढला आणि खसाखसा स्वत:चा चेहरा नॅपकीनने पुसला. कायापालट. अक्षरश: कायापालट झाला होता त्याचा. पंधरा मिनिटांपूर्वी हाच माणूस पलिकडच्या चौकात चक्क भीक मागत होता, असं जर मी आता कुणाला सांगितलं असतं, तर त्याने मलाच अकलेचा भिकारी आहेस का, असं विचारलं असतं.
पिशवी उचलून समोरचा “भिकारी”आता चालू लागला, मीही त्याच्या मागोमाग चालू लागलो. रस्ता जिथे संपत होता, त्या टोकाशी एक रिक्षा उभी होती. भिकाऱ्याने रिक्षावाल्याला हात केला, पाच मिनिटांतच भिकारी रिक्षात बसून स्टेशनच्या दिशेने गेला देखील..
..हा प्रकार काय आहे, याचा तपास लावल्याशिवाय परतायचं नाही, असं ठरवून मी मागून येणाऱ्या रिक्षाला हात दिला आणि स्टेशनला घ्यायला सांगितलं. रस्ता मोकळा असल्याने ती रिक्षा नजरेच्या टप्प्यातच होती.
हा प्रकार काय आहे, हे जाणून घ्यायची माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती..

स्टेशनसमोरच्या पानाच्या टपरीजवळच तो मला दिसला. पांढरपेशा नोकरदार माणसासारखा तो सिगरेट ओढत उभा होता. आता आपण काय करावं, ते कळेना म्हणून मीही थेट टपरीजवळच गेलो आणि सिगरेट शिलगावली.
काय साहेब, कुणाला शोधताय?
त्याचा प्रश्न मला अगदीच अनपेक्षित नव्हता, पण मी त्याच्या मागावर आहे, हे त्याने फार पटकन ओळखल्याचं मला आश्चर्य वाटलं.
नवीन पोस्टिंग दिसतेय तुमची.
म्हणजे तो मला पोलिस समजला होता.
मी पोलिस नाही, मी एका वाक्यात त्याची उत्सुकता संपवली.
समोरच्या माणसाला मी पत्रकार आहे, असं सांगितल्यावर दोन गोष्टी शक्य असतात,
एक तर तो काहीच बोलत नाही, किंवा खूपच बडबड करायला लागतो.
सुदैवाने तो दुसऱ्या प्रकारातला निघाला. आणि त्याने त्याची अद्‌भूत किंवा नॉट सो अद्‌भूत अशी कहाणी मला ऐकवली.
पुढच्याच स्टेशनवर उतरून तो आपल्या घरी जाणार होतो. घर म्हणजे तुमच्या-आमच्यासारखं वन बीएचके फ्लॅट.
त्याचं या व्यवसायातून येणारं उत्पन्न दरमहा साधारण तीसएक हजार रूपये होतं, होय, तीनएक नाही तीसएक.
भीक मागणे हा त्याचा व्यवसाय होता. त्यासाठी तो त्या उच्चभ्रू वस्तीत रोज रात्री आठ ते पहाटे तीन अशी ड्‌यूटी करत असे. रोज घरू न निघताना तो टापटीप, स्वच्छ कपडे घालून निघत असे. आज त्याने जिथे कपडे बदलले, तशाच कमी वर्दळीच्या जागी थांबून तो भिकाऱ्याचा वेश परिधान करे. पहाटे तीनला ऑफिस संपल्यावर तो पुन्हा कपडे बदलून घरी जाई. गेली 20 वर्षे तो हे करत होता.
याच वीस वर्षांच्या कमाईतून त्याने मुलांची शिक्षणं केली, त्याचा एक मुलगा झाडू विकण्याचा व्यवसाय करतो, तर दुसरा कॉलेजला आहे. सध्या राहत असलेल्या वन बीएचके फ्लॅटव्यतिरिक्त त्याने दुसराही एक मोठा फ्लॅट बुक केला आहे, लवकरच त्याचा ताबा मिळेल. याशिवाय इतरही व्यवसायांत त्याने पैसा गुंतवलेला आहे.
एकूण तो आपले दैन्यावस्थेतील, दरिद्री जिण्याचा पुरेपूर उपभोग घेतो आहे.
दिवसाला हजार रूपयांची बेगमी देणारा असा व्यवसाय दुसरा नाही, असं त्याचं मत आहे.
त्याच्या व्यवसाय एरियात गेली वीस वर्षे त्याची एकट्याची मक्तेदारी आहे, दुसऱ्या कुणालाही तो इथं पाय रोवू देत नाही. त्यासाठी भाईंपासून सायबापर्यंत सर्वांची फिल्डिंग त्याने व्यवस्थित लावली आहे.

..हातातल्या सिगरेटचा चटका बसला, तेव्हा मी भानावर आलो. तो नुकताच निघून गेला होता.
धक्क्यातून बाहेर येत मी रिक्षाला हात केला,
बाबा कुछ खाने को दो..
एक भिकारी रिक्षावाल्यापुढे हात पसरत होता.
..मला मात्र त्याच्या जागी सुटा-बुटातला कडक् उद्योगपती दिसू लागला होता.

- अमोल कपोले

Posted in कथा. Tags: . 6 Comments »

तहान

पावसानंतर त्याचा
दर्वळ राहून जातो
तसा
गेल्यानंतर तुझा
वावर राहून जातो

पाउस सरतो विखरून थेंब
मातीत सांडलेले
तू गेल्यावर माझे शब्द
मौनात बांधलेले

अंगोपांगी टिपतो श्रावण
ओसरल्या थेंबांचे भास
एकलाच मग वेचित बसतो
रेंगाळलेले ओले श्वास

चिंब भोवती ओल्या भरते
तृप्त तजेली हिरवी भूल
नकळत ठायी पेरित जाते
तव भेटीची तहान खोल

- अमोल कपोले