निरर्थक..निर्हेतुक

निव्वळ उपयोगितेवर आधारित जगण्यावर त्याचा विश्वास नव्हता. हाताशी उपयोगाचं काम नसल्याने तो आपल्याच खुळ्या नादांत रमायचा. पुरुषांची, स्त्रियांची चित्रं काढणं, सुंदर शिल्प घडवणं असं बरंच काही. जगाच्या दृष्टीनं जे काही निरुपयोगी होतं, निरुद्देश होतं, त्यातच तो वेळ घालवित असे. लोक त्याला हसायचे. त्यालाही कळायचं, आपण काहीतरी “उद्योग” करायला हवा. तो प्रयत्नही करीत असे. पण दुसर्‌या कामांत त्याचं मन लागत नसे.

काही मुलं क्वचितच अभ्यास करतात, आणि तरीही परीक्षेत पास होतात. याच्या बाबतही तसंच झालं. अवघं आयुष्य निरर्थक गोष्टींत घालवूनही मृत्युनंतर कशी कोण जाणे, याला स्वर्गाची दारं खुली झाली. आणि दैवगती म्हणावी की काव्यगत न्याय कुणास ठाउक, पण याला स्वर्गात घेउन आलेल्या देवदुताने महाशयांची रवानगी नेमकी कामसूंच्या नंदनवनात केली.

कामसूंच्या नंदनवनात निवांतपणा सोडून सारं काही सापडेल.

इथले पुरुष म्हणतात, “देवा, आमच्याकडे रिकामा घालवायला एक नॅनो सेकंदही नाही.”

बायका म्हणतात, “चला पटापटा कामं उरका, काळ पुढे चालला. थांबला तो संपला”

सारेच म्हणतात, “अजून भरपूर कामं उरकायचीत. हातातला प्रत्येक क्षण सार्थकी लागला पाहिजे.”

असं सांगताना ते तक्रारवजा उसासे टाकतात खरं, पण याच शब्दांनी त्यांना बळ येतं आणि ते जोमाने कामाला लागतात हेही खरं.

या सार्‌या वातावरणाला त्याचा स्वभाव जराही मिळता जुळता नव्हता. अहो, मर्त्यलोकातलं अवघं आयुष्य ज्याने कसलंही काम न करता घालवलं, तो या कामसूंच्या नंदनवनात कसा रुळेल? त्यामुळे स्वारी दिवसभर भटकंती करत राही. हिरवाईशी हितगूज करी. झर्‌यांच्या सान्निध्यात वेळ घालवीत असे. नंदनवनातली कामसू माणसं त्याच्याकडे “वाया गेलेलं प्रकरण” असं समजून दुर्लक्ष करायचे.

तर अशा या ठिकाणी एक तरुणी रोज नंदनवनातल्या मूक झर्‌याचं पाणी भरून नेण्याचं काम करीत असे. (मूक अशासाठी की कामसूंच्या नंदनवनातला झराही खळखळाटाद्वारे वाया जात असलेली उर्जा वाचवत असे. आता बोला!)

नवथर तारूण्याने बहरलेल्या या मुलीचं चालणं इतकं डौलदार आणि चपळ की जणू कुशल कलाकाराची वीणेवरून नजाकतीनं फिरणारी नाजुक बोटं. चंचलपणात तिला हार न जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे सदा न कदा कपाळावर येणारी तिच्याच केसांची बटवेलांटी.

आजही ती आपल्याच नादात घडा भरुन घेण्यासाठी आली. त्याचवेळी तोही तेथे रेंगाळत होता. पाणी भरताना तिची नजर अभावितपणेच त्याच्याकडे गेली. एखाद्या राजकन्येची दारी आलेल्या याचकाकडे जावी तशी.

“ओहो, तुझ्याकडे काही काम नाहीये का?” तिनं विचारलं.

“काम? कामात वाया घालवायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये” तो उत्तरला.

पण तिला काही त्याच्या बोलण्याचा अर्थ लागला नाही. ती म्हणाली, “तुला हवं असल्यास मी तुला काही काम देईन”

“मूक निर्झराच्या देवते, गेले काही क्षण मी तुझ्याकडून काहीतरी मागावं असाच विचार करतोय”, तो उत्तरला.

“कसलं काम हवंय तुला?” तिनं विचारलं.

“तुझ्या घागरींतली एक मला हवी आहे” तो म्हणाला.

“तुला यातून पाणी काढायचंय का?”

“नाही. मला त्यावर चित्र काढायचंय”

“चित्र? हू” नाक फेंदारून ती म्हणाली, “असल्या रिकामटेकड्या गोष्टींसाठी माझ्याकडे मुळीच वेळ नाहीये”

असं म्हणून ती घागरी उचलून चालू लागली.

पण त्यानं तिचा पिच्छा सोडला नाही. त्यानंतर रोज जेव्हा ती झर्‌याचं पाणी भरायला येई तेव्हा हा रोज तिची मनधरणी करत असे. चित्र काढायला घागर मागत असे.

अखेर एक दिवस तिचं मन द्रवलं आणि तिनं आपली एक घागर त्याला दिली.

तो चित्र काढू लागला. लयदार रेषा आणि विलोभनीय रंगांच्‍या मेळातून त्याने ती घागर सजवली, देखणी बनवली. चित्र पूर्ण करून त्याने जेव्हा घागर तिला परत केली, तेव्हा ती पाहातच राहिली. घागर तोंडासमोर धरून चित्र पुन्हा-पुन्हा निरखत राहिली. डोळ्यात कोडं पडल्याचे भाव. भुवयांची धनुकली जास्तच वाकल्यासारखी.

“या रंगरेषांचा अर्थ काय रे? त्यांचा नेमका उपयोग काय?” तिनं त्याला विचारलं.

त्याला हसू आलं.

“शून्य. चित्राला अर्थ, हेतू असतोच असं नाही.” तो म्हणाला.

घागर घेउन ती घरी आली. घरच्यांच्या नजरा चुकवून दिव्याच्या प्रकाशात तीवरची कलाकुसर न्याहाळत राहिली. पुन्हा पुन्हा. प्रत्येक बाजुने. उलटसुलट. त्या रात्री तिला झोप लागेना. अंथरुणातून उठून तिने दिवा लावला आणि रात्रीच्या नीरव शांततेत घागरीवरची कलाकुसर पुन्हा न्याहाळली. आयुष्यात प्रथमच तिने निरर्थक, निर्हेतुक असं काहीतरी पाहिलं होतं.

दुसर्‌या दिवशी ती जेव्हा घागरी घेउन पाणी भरण्यासाठी निर्झराकडे निघाली तेव्हा तिची पावलं नेहमीच्या घाईनं पडत नव्हती. तिच्या मनातही एक विलक्षण नवी जाणीव भरून राहिली होती. जिला ना हेतू होता, ना अर्थ.

आजही तो तिथं उभा होता.
गोंधळून तिनं विचारलं, “आज तुला काय हवंय?”
“काही नाही. आणखी थोडंसं काम” तो म्हणाला.
“कोणतं काम आवडेल तुला?”
“तुझ्या केसांसाठी एक रंगीबेरंगी रिबिन तयार करावी म्हणतो” तो म्हणाला.
“कशासाठी?”
“असंच”

आणि त्याने रिबिनी बनवल्याही. सुंदर, रंगारंग. आता तिचा रोजचा बराचसा वेळ त्या सुंदर रिबिनी केसांत बांधण्यात जाउ लागला. बरीचशी मिनिटं निरर्थक वाया जाउ लागली. बरंचसं काम शिल्लक राहू लागलं.

हळूहळू कामसूंच्या नंदनवनातल्या बर्‌याचशा लोकांची कामं तुंबून राहू लागली. प्रत्येकाचा थोडाफार वेळ चित्रं काढणे, शिल्प घडवणे अशा निरर्थक गोष्टींत वाया जाउ लागला.

नंदनवनाचे श्रेष्ठी चिंताक्रांत बनली. कामांवर फारच परिणाम होउ लागला होता. नंदनवनाच्या इतिहासात आजवर असं कधी घडलं नव्हतं. तातडीची सभा बोलावण्यात आली.

देवदूताने घाईतच सभेत प्रवेश केला, श्रेष्ठींना मुजरा केला आणि आपली चूक कबुल केली.

“क्षमस्व. मी चुकीच्या माणसाला नंदनवनात आणलं”, तो म्हणाला, “या सार्‌याला तोच जबाबदार आहे.”

त्याला बोलावणं धाडण्यात आलं.

शांतपणे त्याने सभेत प्रवेश केला. सभेनं त्याच्याकडे पाहिलं. कलाकाराला साजेसा वेष, हातात निरनिराळे कुंचले, रंगांच्या वड्या, कपड्यांना रंगांचे डाग… पाहता क्षणीच त्यांना समजलं. हा मनुष्य नंदनवनात राहण्यास योग्य नाही.

“या ठिकाणी तुमच्या सारख्या लोकांना स्थान नाही. ताबडतोब चालते व्हा” अध्यक्षांनी कठोर स्वरात आज्ञा सोडली.

त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला, आपले कुंचले आणि रंग गोळा केले आणि सभेतून निघाला. जाण्यासाठी वळणार इतक्यात त्याच्या कानावर शब्द ओले.
“थांब, मलाही तुझ्यासोबत यायचंय”
मुक्या निर्झरावर पाणी भरणारी ती. तिचाच आवाज होता तो.

सारी सभा विस्मयचकित झाली. नंदनवनात अशी घटना कधीही घडली नव्हती. एक निर्हेतुक आणि निरर्थक घटना.

- (गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या A Wrong Man in Workers Paradise चे भाषांतर)

3 प्रतिसाद to “निरर्थक..निर्हेतुक”

  1. Priya Says:

    कथा सुंदर आहे पण यापेक्षा आधीच्या दोन्ही कथांचे भाषांतर उत्तम झाले आहे

    • अमोल Says:

      धन्यवाद!
      पण त्या कथा (गुप्तधन आणि सरडा) भाषांतरित नसून रुपांतरित आहेत. त्यामुळेच त्या जास्त स्वाभाविक वाटतात.

  2. आल्हाद alias Alhad Says:

    sunder

तुमचा अभिप्राय नोंदवा