सये…

सये तुझी आठवण
पावसाची सर
अवकाळी, अवचित
खुणा अंगभर

सये तुझी आठवण
जिवाची काहिली
भर उन्ह वाटतसे
शीतल सावली

सये तुझी आठवण
मुठीतला पारा
मिठीत येईल कसा
भरारता वारा?

सये तुझी आठवण
साठते डोळ्यात
आसवे कोरडी अन्
झिरपे गळ्यात

सये तुझी आठवण
मनात रुतली
गुलाब शोधाया गेलो
काट्याला फितली

सये तुझी आठवण
तुझ्याच सारखी
नको तिथं भेटे अन्
एकांती पारखी !

- अमोल

3 प्रतिसाद to “सये…”

  1. प्रशांत उदय मनोहर Says:

    छान. सुरेख.

    विशेषतः
    “सये तुझी आठवण
    साठते डोळ्यात
    आसवे कोरडी अन्
    झिरपे गळ्यात”

    शेवटही अप्रतीम.

  2. kiran Says:

    ब्लॉग छान आहे !! मी कायम वाचतो
    खुप दिवसात नविन काही टाकले नाहीत तुम्ही


तुमचा अभिप्राय नोंदवा