सुपारी

भाईच्या डोक्याची एवढी मंडई कधीच झाली नव्हती.
नव्हे, ती करुन घेण्याचा भाईचा स्वभावच नव्हता.
भाईचा भर सारा ऍ़क्शनवर.
जी काय मंडई करायची ती समोरच्याच्या डोक्याची.
त्याशिवाय तो भाई झालाच नसता ना.
आणि समाजात त्याला भाई म्हणून मान (!) बी मिळाला नसता.
भाई शेल्फ मेड होता.
आणि सगळी शेल्फ मेड मान्सं असतात तसाच होता. नो नॉन्सेन्स.
जे काय असेल ते एकदम एक घाव दोन तुकडे.
आर या पार.
त्यामुळे प्रश्न कोणतेही असोत, भाईच्या समोर गेले की ते सुटणार,
नाहीतर पार निकाल लागणार.
पण सरकारसारखं भिजत घोंगडं..
कधीच नाही.
भाईला ते परवडणारच नव्हतं.
नायतर तो भाई होवूच शकला नसता ना.
भाई तसा लीडर. बॉर्न लीडर.
आपल्या टीमच्या काळजात घुसून राहणारा.
म्हणूनच गेली वीस वर्ष त्याच्या विरोधात कुणी बंड करून उभं राहिलं न्हवतं.
अर्थात भाईनं तसं कुणाला राहू दिलंही नाही.
पण भाई तसा गुणग्राहकही बरं का.
म्हणूनच शार्प शूटर शंभू असो किंवा सुरेबाज सुरेश,
प्रत्येक यशस्वी गेम नंतर भाई त्यांच्या कलेचं वारेमाप कौतुक करायचा. म्हणते अजूनही करतो.
त्याच्या दृष्टीनं शंभू आणि सुरेश म्हणजे गेम मधले आर्टिस्टच.
भाई तसा कोणाला डरायचा नाही.
कोणालाच नाही. म्हणजे निदान तसं दाखवायचा नाही.
त्याशिवाय तो भाई झालाच नसता ना.
तर भाई काही लोकांना आपण डरतो असं दाखवायचा. म्हणजे दाखवतो.
खरं तर भाईच अशा लोकांना प्रोटेक्शन देतो.
पण आपणच त्यांच्या प्रोटेक्शनमदी आहोत असं दाखवतो.
म्हणजे दाखवावं लागतं.
कारण ही सगळी मोठी माणसं.
गल्ली पासून दिल्ली पर्यंत यांची वट.
आणि वटवट
देशहिताची.
पण खटपट स्वहिताची.
काय करतील, त्यांनाही पोट आहेच ना भाईसारखं.
हा आता ते जरा अंमळ मोठं आहे म्हणा.
पण त्याला कोण काय करु शकतो.
तर भाई यांच्या हुकमाचा ताबेदार.
आणि यांच्या सेकंड लाईफचा शिलेदार.
सेकंड लाईफ हो. बियाँड बुक्स.
हे सोडले, तर भाईला कोणाचं ऐकून घेण्याची सवय नाही.
भाई इतरांना ऐकवतो.
कधीतरी तोंडाने आणि बरृयाचदा हाताने.
त्यामळे भाई कोणाला आन्सरेबल नाही बरं का.
अगदी स्वत:ला सुद्धा.
त्यामुळेच त्याच्या डोक्याची मंडई सहसा कधी होत नाही.
मागच्या वेळेला झाली ती वीसेक वर्षांपुर्वी.
तेव्हा तो गँगचा शार्प शूटर होता.
बॉसचा आवडता. त्यामुळे बॉसनंतर गँगची सूत्रं याच्याकडेच.
पण काय झालं कुणास ठाउक.
कोणी तरी याच्यावरच गेम केली आणि बॉसचे कान भरले.
बॉसनं याला गँगेतूनच काढलं.
भाईच्या डोक्याची मंडई झाली.
आणि दोन खून पडले.
एक कान भरणारृयाचा.
आणि दुसरा साक्षात बॉसचा.
तेव्हापासूनच तर भाई भाई झाला.
तर आता वीस वर्षानंतर भाईच्या डोक्याची मंडई करण्याची बुद्धी झाली कोणाला?
काय राव,
बापाला सवाई ठरतं कोण?
बेटाच ना?
तर अशा या बापसे बेटा सवाई पोरानं, म्हणजे सवाई भाईनं भाईची झोप उडवली.
पण भाईची झोप का उडाली?
अहो, भाई तसा उसूलाचा पक्का. म्हणजे जे चांगलं ते चांगलं आणि वांगलं ते वांगलं.
उगाच हे माझं आहे म्हणून चांगलं
आणि ते माझं नाही म्हणून वाईट असं काही नाही.
त्यामुळे भाईच्या गँगेत गुणवानांची भराभर प्रगती झाली. होते.
म्हणूनच निष्ठावंतांची संख्या भाईच्या गँगेत कमी नाही.
आणि भाईनंही त्यांना कधी निराश केलं नाही.
विशेषत: शंभू आणि सुरेशला.
त्यामुळेच माफिया लँडमध्ये आता इलेक्शन आले, तर भाई आपल्याला सुपारी देणार अशी खात्री या दोघांना होतीच.
आणि भाईचाही तसा विचार होताच.
दोघांनाही विशेष जबाबदारी देण्याचा.
पण,
सवाई भाईच्या महत्वाकांक्षेनं मध्येच डोकं वर काढलं.
आणि भाईचं नियोजनच कोलमडलं.
अगदी राज्याच्या वीज नियोजनासारखं.
तुमचा वारस म्हणून सुपारीचा मान मला मिळाला पायजे, अशी गर्जना करुन सवाई भाईनं बापालाच दम भरला.
आता भाई सापडलाय डायलेम्यात.
इतक्या वर्षांचे निष्ठावंत सहकारी
की सवाई भाई?
इकडे एके ५६
तिकडे रामपुरी
भाई काय करणार?
यातून कसा मार्ग काढणार?
गैंगेत बंडखोरी न होवू देता
आणि घरात महाभारत न घडू देता
भाई गेम कसा करणार?

बघू या छोटृयाशा ब्रेकनंतर….

तुमचा अभिप्राय नोंदवा