
विकणे आहे…
ऑक्टोबर 12, 2009एका अतिसामान्य नागरिकाचे म त योग्य किंमतीस विकणे आहे…
अटी व शर्ती :
उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच असावा. (त्याशिवाय मागेल तो दाम कसा मिळणार?)
उमेदवार अशिक्षित असावा. (त्याशिवाय तो राजकारणात यशस्वी कसा असणार?)
उमेदवार चारित्र्यहीन असावा. (त्याशिवाय वाटृटेल ती किंमत मोजण्याइतका पैसा त्याच्याकडे कोठून येणार?)
उमेदवार सामाजिक उत्कर्षापेक्षा वैयक्तिक उत्कर्षाला महत्व देणारा असावा.(त्याशिवाय तो आमचा आर्थिक उत्कर्ष कसा करणार?)
वरील अटी पूर्ण करु शकणारयांनी त्वरित संपर्क साधावा.
मोबदल्याच्या निवडीसाठी पर्याय -
१ – स्वत:चा विकास
२ – स्वत:चा व कुटुंबाचा विकास
३ – स्वत:चा, कुटुंबाचा व अनुयायांचा विकास
४ – स्वत:चा, कुटुंबाचा, अनुयायांचा, नातेवाईकांचा विकास
५ – पर्याय १ ते ४ सह जमल्यास देशाचा विकास
त्वरा करा, मर्यादित कालावधीसाठीच ऑफर आहे.
ता.क. सर्वाधिक बोली लावणारयांस एका म ता वर एक म त फ्री मिळेल!
आपला
- अतिसामान्य मत’दारु’ अण्णा.
तो सूर शोधण्यासाठी
ऑक्टोबर 8, 2009
www3.telus.net वरुन साभार
मौ को कहॉं ढूँढे रे बंदेऽ
गंगाद्वारचा पहाड सुरू होतो, तिथल्या जंगलात पायऱ्यांकडे जाणारा रस्ता सोडून जरा आतल्या बाजूला जावं. रानपाखरांच्या ओल्या कुजबुजीत एकतारीवरचा सूर ऐकू येतो. पावसाच्या अलगद कोसळण्याच्या संथ लयीशी सम साधून कुणाचा तरी भक्तीनं भारलेला स्वर. कोणतेही गेय संस्कार न झालेला, तरीही आतून आल्यासारखा हलवून टाकणारा..
त्या आवाजाचा कानोसा घेत थोडंसं जंगलात आत शिरावं.. एका बाभळीच्या झाडाच्या खोडाला हात टेक वून उभा संन्यासी. समोर उभ्या ब्रह्मगिरीच्या डोंगराकडे पाहत भजन गुणगुणतोय.
शेजारी बहुधा त्याचाच पाळलेला श्वान. पावसानं ओलं झालेलं अंग झटकत संन्याशाच्या मागे-पुढे गिरक्या घालतो. आपल्याच तंद्रीत असलेला संन्यासी गाण्याच्या लयीत पाठीमागे वळतो. पाहणाऱ्याकडं दृष्टी जाताच डोळे अर्धवट मिटून हसतो. ओठांवरचं भजन त्याच लयीत हलकेच संपतं.
फार छान चाल आहे हो भजनाची !
नुस्ती चालच ऐकली का ?
?
चालीपेक्षा शब्द जास्त गोड आहेत रे
उत्तरादाखल ऐकणारा सहमतीदर्शक हसतो.
संन्याशाची उमर पन्नाशीच्या आसपासची.
स्वत:शीच काही तरी संवाद सुरू असल्यासारखा.. तो काही क्षण शांत होतो. डोळे मिटून श्वास आत घेत एक ओमकार म्हणतो.
तू मत कर मोहऽ
एकतारीच्या षडजासह दुसरं भजन सुरू होतं…
तयारीच्या गायकासारखा आवाज नसूनही, त्यातनं भरभरून वाहणारा भाव ऐकणाऱ्यांच्या कांनांपलीकडे आत खोलवर शिरतो. ऐकतच राहावं अशी अवस्था.
या चाली तुम्ही लावल्यात ?
पुन्हा चालीभोवतीच घोटाळलास का ?
सांगा ना..
मी लावलेल्या नाहीत. मला संगीतातलं काही कळत नाही रे.. ऐकलेल्या आहेत..
कुणाकडनं..
गुरुजींकडनं. त्यांना संगीताची विलक्षण जाण होती..
कुठनं आलात तुम्ही ?
ते फारसं महत्त्वाचं नाही..
तुम्ही गाणं शिकलाहात का ?
नाही. गुरुजींनीच शिकवलेली भजनं आहेत, ती म्हणतो.
फार गोड चाली आहेत.
आतून गायलं की साधं गाणंही गोड वाटतं. हे तर देवाचं भजन आहे, ते गोड वाटणारच.
सिंहस्थासाठी आलाहात का?
उत्तरादाखल फक्त होकारार्थी मान डोलावली जाते?
मग साधुग्रामात राहणार असाल ?
नाही. इथंच..
इथं कुठं ?
कुठंही..
अशी किती भजनं तुम्हाला येतात ?
तुला किती ऐकायचीत ?
इच्छा तर भरपूर आहे; पण तेवढा वेळ नाहीये हो.
पुन्हा नवं भजन सुरू होतं..
तेवढ्यात ऐकणारा चमकतो. अरे, हे तर मघाचंच भजन.
मौ को कहॉं ढूँढे रेऽ
पण ही चाल पहिल्यापेक्षा वेगळी.. गोडवा मात्र तेवढाच.. ऐकणारा तल्लीन होऊन जातो.
आणखी ऐकायचंय ?
पुन्हा दुसरं भजन सुरू होतं. तू मत कर मोहऽ हे देखील पहिल्या खेपेपेक्षा वेगळं. अनवट, पण मधुर..
यांच्याकडे अशा चाली आहेत तरी किती..
ऐकणाऱ्याच्या मनातला प्रश्न जणू ओळखल्यासारखं समोरून उत्तर येतं,
मला ही दोनच भजनं गुरुजींनी शिकवली.
म्हणाले, आयुष्यभरासाठी तुला एवढं पुरेसं आहे.
त्यांच्यातच ईश्वर भेटेल. तेव्हापास्नं रोज शोधतोय. हर प्रकारे.. अजून तो स्वर सापडला नाही.
ऐकणारा स्तब्ध झालेला..
एकतारी पुन्हा छेडली जाते..
समोरच्या झाडीत संन्यासी दिसेनासा होतो.
दूर जाणारे भजनाचे सूर मात्र तिथंच रेंगाळत राहतात…
- अमोल
(संन्यस्तछटा या २००४ मध्ये प्रकाशित माझ्या पुस्तकातील एक उतारा)
कोजागरी
ऑक्टोबर 6, 2009काल रात्री अचानक
डोळ्यांनी चांदणं खुडताना
हळूच हाती लागला
तुझ्या पापणीआडचा चंद्र
आणि ओंजळीत उतरलेल्या
त्याच्या प्रकाशाची तिरीप
मनाच्या माजघरात आरपार
अवघडलेल्या अंधारात
माझे मलाच शोधताना
हलकेच लखलखून गेल्या
तुझ्या असण्याच्या खाणाखुणा
ओठावरचा दवबिंदू वेचताना
अलगद गालावर फिरावा
उष्ण लाजरा श्वास
तशीच चांदण उब पसरली
अंगांगावरती
आवेगाची घट्ट रुतावी
नखे त्वचेवर
तसे उमटले कुजबुजलेले
शब्द क्षणांच्या
देहावरती
आणि सरती रात्र
नेमका समजावून गेली
तुझ्या कटाक्ष पौर्णिमेचा
माझ्या हरवलेपणाशी
अनोळखी संदर्भ
अर्थाअर्थी
को जागर्ती, को जागर्ती !
- अमोल
अमोल यांनी पोस्ट केले
अमोल यांनी पोस्ट केले
अमोल यांनी पोस्ट केले 





