लंगोटी यार!

एखाद्या लंगोट मित्राशी मैत्री कधी झाली, या प्रश्नाचं उत्तर जेवढं अवघड असतं, तेवढंच अवघड उत्तर आयुष्यात पुस्तकांचा प्रवेश कधी झाला या प्रश्नाचं आहे. पण अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची सवय आई-वडिलांमुळे लागली हे निश्चित. पहिली पुस्तकं वाचलेली आठवतात ती अर्थातच पंचतंत्र, इसापनीती वगैरे. मग अमर चित्रकथा, डायमंडची हिदीतली कॉमिक्स, अरेबियन नाईटस् आणि आपला फास्टर फेणे, बिपीन बुकलवार, नाथमाधवांची वीरधवल, सोनेरी टोळी अशी सुरुवात झाली. पाचवी-सहावीत असतानाच स्वामी, मृत्युंजय, श्रीमान योगी वडिलांनी हातात ठेवले. घरात काहीही वाचायला मोकळीक असल्याने आणि अभ्यास एके अभ्यास आणि माक्र्स हेच सर्वस्व हा त्यांचा दृष्टिकोन कधीच नसल्याने आम्ही (म्हणजे मी आणि माझा मोठा भाऊ) अधाशासारखं वाचन केलं. वर्तमानपत्रांशी, रविवारच्या पुरवण्यांशी आमची गट्टी अगदी त्या दिवसांपासूनची. त्यामुळे रोजचं वाचन हे रिच्युअल सारखं रूटीनचा अविभाज्य भाग बनलं असावं.
वाचनाचे फायदे आयुष्यात खूप झाले. पण तात्कालिक फायदा म्हणजे भाषेचा अभ्यास हा कधीच अभ्यास वाटला नाही. आम्ही तो एंजॉय केला. कारण ज्या लेखकांचे धडे आम्हाला पाठ्यपुस्तकात असायचे, त्यांचं लेखन बऱ्याचदा वाचलेलं असल्याने एक कम्फर्ट लेव्हल यायची.
वर्तमानपत्रांच्या वाचनामुळे भोवतालच्या जगाचं भान आलं. आपल्या परिघापलीकडचीही अनेक जगं आहेत, त्यांची ओळख या वाचनाने करून दिली. साहित्याची गोडीही वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांनी लावली, वाढवली. कारण तेव्हा प्रत्येक पुरवणीत दर्जेदार साहित्य हा एक अविभाज्य भाग होता. अगदी सर्व वर्तमानपत्रांमध्ये मोठमोठी साहित्यिक मंडळी लिहित होती आणि आमच्यासारख्यांवर संस्कार करीत होती.
वाचनाने जगाकडे पाहण्याचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू डेव्हलप होत गेला. चांगलं-वाईट, म्हणजे दर्जेदार आणि भिकार याच्यातला फरक शिकवला. ‘देअर इज मोअर टू द वर्ल्ड दॅन मीटस दी आय’ हा धडाही वाचनानेच दिला. आयुष्यात आपण प्रत्येक अनुभव घेऊ शकत नाही; पण असे अनेकानेक अनुभव वाचनातून मिळाले आणि प्रत्येक वाचनानंतर ‘हं.. आयुष्य असं असतं तर’ आणि ‘अरेच्चा ! आयुष्य असंही असू शकतं तर..’ अशी भन्नाट अनुभवांची तोंडओळख वाचनाने करून दिली.
मराठी वाचनाने दृष्टी व्यापक केली, तर इंग्रजी वाचनाने ती ग्लोबल व्हायला मदत झाली. कारण इंग्रजीचा एकूण जगभरातील संचार आणि वैविध्य यामुळे एक वेगळा आणि विविधांगांनी ‘रिच’ युनिव्हर्स समोर खुला झाला. आयुष्यातल्या कोणत्याही पैलूकडे मनमोकळेपणाने आणि नि:संकोचपणे पाहण्याची नजर, धीटपणा, झोकून देऊन भिडण्याची मानसिकता, क्वेश्चनिग स्पिरिट असे बरेच काही ‘गुण’ या वाचनाने दिले.
इंटरनेट आणि विशेषत: ब्लॉग्जच्या आगमनानंतर तर आपल्यासाठी इझीली अॅक्सेसिबल असं वाचनाचं ‘ट्रेजर ट्रव्ह’च खुलं झालंय. ‘आय ब्रो कसे करावे’ यापासून थेट ‘राजीनामा कसा लिहाल?’ इथपर्यंत पृथ्वीतलावरच्या आणि पृथ्वीबाहेरच्याही अनेक गोष्टींचं ज्ञान तिथे आहे. ब्लॉग्जमुळे लेखक आणि वाचक यांच्यातला फरकच संपुष्टात आल्यासारखं झालंय. प्रत्येकजण व्यक्त होतो आहे, अनुभव सांगतो आहे, ज्यातून आपल्यालाही शिकायला मिळतं.
प्रत्येक चांगलं पुस्तक, लेखन किंवा अगदी चारोळीसुद्धा आपल्याला काहीतरी देऊन जातच असते. त्यामुळे वाचनाने मला काय मिळालं याची यादी करायची झाल्यास ती वाचलेल्या पुस्तकांइतकीच मोठी होईल. वाचनाने संवेदनशीलता दिली, चांगल्या-वाईटाचं भान दिलं, बदलत्या जगाबरोबर बदलण्याची दृष्टी दिली. विचारांची स्पष्टता दिली, स्वत:ला तपासून पाहण्याची क्षमता दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं वाचण्याचं कुतूहलही या वाचनानंच दिलं आणि जोपासलं. खऱ्या अर्थाने ‘एन्रिच्ड लाईफ’ वाचनाने दिलं.
त्याबद्दल ‘हॅटस ऑफ टू द रिटन वर्ड’!

पूर्वप्रसिद्धी – लोकमत ऑक्सिजन पुरवणी – दि.२६ मार्च २०१०

मूळ लेखाची लिंक -

http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/OxygenEdition-MainNews.php?articledate=2010-03-26

वेड

वेड घेऊनी अलौकिकाचे
असेच काही करुन जावे
शतजन्माचे जगणे सारे
एका क्षणात जगून जावे

असे मिळावे दान मनाला
अक्षय, अक्षर प्रसन्नतेचे
चैतन्याच्या कणात एका
जग हे सारे भरून जावे

असे सुचावे कवितेलाही
शब्‍द, सुरांच्या मनातले
पूर्णत्वाचे गाणे त्यांनी
एका स्वरात म्हणून जावे

असे भिडावे आव्हानांना
मुठीत वारा भरताना
सारी धरती, अवघे अंबर
एका कवेत भरून घ्यावे

असे मिळावे बाहुंना या
बळ वज्राच्या मुशीतले
त्रिकालाचे अनंत अंतर
एका उडीत पार करावे

असे असावे सत्व तयाच्या
चरणी मस्तक नमताना
युगायुगांच्या उपासनेविण
एका हाकेत तरून जावे!

अतिथी देवो भव

समानशीले व्यसनेषु सख्यम्

नम्र आवाहन!

या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.
Marathi Mandali!

ईमेलद्वारे नवीन पोस्टस मिळवा.

Join 7 other followers

Follow

Get every new post delivered to your Inbox.