
सुपारी
सप्टेंबर 21, 2009भाईच्या डोक्याची एवढी मंडई कधीच झाली नव्हती.
नव्हे, ती करुन घेण्याचा भाईचा स्वभावच नव्हता.
भाईचा भर सारा ऍ़क्शनवर.
जी काय मंडई करायची ती समोरच्याच्या डोक्याची.
त्याशिवाय तो भाई झालाच नसता ना.
आणि समाजात त्याला भाई म्हणून मान (!) बी मिळाला नसता.
भाई शेल्फ मेड होता.
आणि सगळी शेल्फ मेड मान्सं असतात तसाच होता. नो नॉन्सेन्स.
जे काय असेल ते एकदम एक घाव दोन तुकडे.
आर या पार.
त्यामुळे प्रश्न कोणतेही असोत, भाईच्या समोर गेले की ते सुटणार,
नाहीतर पार निकाल लागणार.
पण सरकारसारखं भिजत घोंगडं..
कधीच नाही.
भाईला ते परवडणारच नव्हतं.
नायतर तो भाई होवूच शकला नसता ना.
भाई तसा लीडर. बॉर्न लीडर.
आपल्या टीमच्या काळजात घुसून राहणारा.
म्हणूनच गेली वीस वर्ष त्याच्या विरोधात कुणी बंड करून उभं राहिलं न्हवतं.
अर्थात भाईनं तसं कुणाला राहू दिलंही नाही.
पण भाई तसा गुणग्राहकही बरं का.
म्हणूनच शार्प शूटर शंभू असो किंवा सुरेबाज सुरेश,
प्रत्येक यशस्वी गेम नंतर भाई त्यांच्या कलेचं वारेमाप कौतुक करायचा. म्हणते अजूनही करतो.
त्याच्या दृष्टीनं शंभू आणि सुरेश म्हणजे गेम मधले आर्टिस्टच.
भाई तसा कोणाला डरायचा नाही.
कोणालाच नाही. म्हणजे निदान तसं दाखवायचा नाही.
त्याशिवाय तो भाई झालाच नसता ना.
तर भाई काही लोकांना आपण डरतो असं दाखवायचा. म्हणजे दाखवतो.
खरं तर भाईच अशा लोकांना प्रोटेक्शन देतो.
पण आपणच त्यांच्या प्रोटेक्शनमदी आहोत असं दाखवतो.
म्हणजे दाखवावं लागतं.
कारण ही सगळी मोठी माणसं.
गल्ली पासून दिल्ली पर्यंत यांची वट.
आणि वटवट
देशहिताची.
पण खटपट स्वहिताची.
काय करतील, त्यांनाही पोट आहेच ना भाईसारखं.
हा आता ते जरा अंमळ मोठं आहे म्हणा.
पण त्याला कोण काय करु शकतो.
तर भाई यांच्या हुकमाचा ताबेदार.
आणि यांच्या सेकंड लाईफचा शिलेदार.
सेकंड लाईफ हो. बियाँड बुक्स.
हे सोडले, तर भाईला कोणाचं ऐकून घेण्याची सवय नाही.
भाई इतरांना ऐकवतो.
कधीतरी तोंडाने आणि बरृयाचदा हाताने.
त्यामळे भाई कोणाला आन्सरेबल नाही बरं का.
अगदी स्वत:ला सुद्धा.
त्यामुळेच त्याच्या डोक्याची मंडई सहसा कधी होत नाही.
मागच्या वेळेला झाली ती वीसेक वर्षांपुर्वी.
तेव्हा तो गँगचा शार्प शूटर होता.
बॉसचा आवडता. त्यामुळे बॉसनंतर गँगची सूत्रं याच्याकडेच.
पण काय झालं कुणास ठाउक.
कोणी तरी याच्यावरच गेम केली आणि बॉसचे कान भरले.
बॉसनं याला गँगेतूनच काढलं.
भाईच्या डोक्याची मंडई झाली.
आणि दोन खून पडले.
एक कान भरणारृयाचा.
आणि दुसरा साक्षात बॉसचा.
तेव्हापासूनच तर भाई भाई झाला.
तर आता वीस वर्षानंतर भाईच्या डोक्याची मंडई करण्याची बुद्धी झाली कोणाला?
काय राव,
बापाला सवाई ठरतं कोण?
बेटाच ना?
तर अशा या बापसे बेटा सवाई पोरानं, म्हणजे सवाई भाईनं भाईची झोप उडवली.
पण भाईची झोप का उडाली?
अहो, भाई तसा उसूलाचा पक्का. म्हणजे जे चांगलं ते चांगलं आणि वांगलं ते वांगलं.
उगाच हे माझं आहे म्हणून चांगलं
आणि ते माझं नाही म्हणून वाईट असं काही नाही.
त्यामुळे भाईच्या गँगेत गुणवानांची भराभर प्रगती झाली. होते.
म्हणूनच निष्ठावंतांची संख्या भाईच्या गँगेत कमी नाही.
आणि भाईनंही त्यांना कधी निराश केलं नाही.
विशेषत: शंभू आणि सुरेशला.
त्यामुळेच माफिया लँडमध्ये आता इलेक्शन आले, तर भाई आपल्याला सुपारी देणार अशी खात्री या दोघांना होतीच.
आणि भाईचाही तसा विचार होताच.
दोघांनाही विशेष जबाबदारी देण्याचा.
पण,
सवाई भाईच्या महत्वाकांक्षेनं मध्येच डोकं वर काढलं.
आणि भाईचं नियोजनच कोलमडलं.
अगदी राज्याच्या वीज नियोजनासारखं.
तुमचा वारस म्हणून सुपारीचा मान मला मिळाला पायजे, अशी गर्जना करुन सवाई भाईनं बापालाच दम भरला.
आता भाई सापडलाय डायलेम्यात.
इतक्या वर्षांचे निष्ठावंत सहकारी
की सवाई भाई?
इकडे एके ५६
तिकडे रामपुरी
भाई काय करणार?
यातून कसा मार्ग काढणार?
गैंगेत बंडखोरी न होवू देता
आणि घरात महाभारत न घडू देता
भाई गेम कसा करणार?
बघू या छोटृयाशा ब्रेकनंतर….
मधुर भागवतने गाडी घेतली त्याची गोष्ट
सप्टेंबर 17, 2009तर हल्लीची ही जनरेशन.
प्रचंड कॉन्फिडन्ट आहे हो.
आणि क्लिअरही.
आपल्याला नेमकं काय हवंय, काय नको बरोबर माहिती आहे यांना.
जे काय असेल ते रोखठोक.
रोखठोक माणसाशी आपलं जमतंच. प्रश्नच नाही.
त्यामुळेच संध्याकाळी बसू या म्हणताच पठ्ठ्या आढेवेढे न घेता तयार झाला.
आणि विषय काढण्याआधीच बोलायलाही लागला.
“सर मला माहिती आहे, तुम्ही मला काय सांगणार आहात ते. आपल्या डेअरीतल्या दुधात राजरोस भेसळ चालते आणि त्याकडे डोळेझाक करण्याचे वरुन आदेश आहेत”
वा रे पठ्ठ्या.
मान गये.
म्हटलं बरं झालं, समजावण्याची गरज नाही. धमकावण्याची नाही की घाबरवण्याचीही नाही. मोकळं वाटलं एकदम.
म्हणालो, “लेका, स्वत:हून पॉइंटावर आलास ते बरं केलंस, आपला दोघांचाही वेळ वाचवला आणि श्रमही”
तर विचारलंच त्याने, “आप्पा, तुम्हाला भीती नाही वाटत का? पकडलं जाण्याची”
म्हटलं, कोण पकडणार? इथं पकडणारेच सोडवायला बसलेत. सारं काही त्यांच्या संमतीनेच तर होतंय. मग कुणी कुणाला पकडण्याचा प्रश्न येतोच कुठे.
डेअरी कुणाची आहे माहिती आहे ना?
तर म्हणाला ते तर सार्या जगाला माहिती आहे.
तर त्याला म्हटलं, आता धृतराष्ट्रासारखी डोळृयाला पट्टी बांध. आणि हा संजय जे सांगतो तेच खरं समज. दोन वर्षांत गाडी घेतोस की नाही बघ.
त्यावर फक्त्त हसला.
म्हटलं इंजिनिअरिंगसाठी किती पैसा खर्च केलास रे, सात-आठ लाख ओतले असतील कमीत-कमी. तो वसूल व्हायला नको का?
करु, करु असं म्हणाला.
आज दोन वर्ष झाली त्या गोष्टीला.
पठ्ठ्या धृतराष्ट्राचाही बाप निघाला.
दोन वर्षांत गाडी घेतलीच.
मी म्हटलंच होतं सुरुवातीला, हा पोरगा पुढे जाणार.
त्या दिवसापासून पुढे त्याने ना कोणाच्या रिडिंगविषयी शंका घेतली, ना कधी मला प्रश्न विचारले.
म्हटलं असा कसा हा एवढा सोपा-सरळ. काहीही विरोध नाही, काही नाही.
पण खरोखरच त्याने काही खुसपट काढलं नाही.
आणि अखेर गाडी घेतली.
आता आपण, मधुर भागवतने गाडी घेतल्यानंतर काय झालं, त्याची गोष्ट पाहणार आहोत,
पण ते पुढच्या भागात.
(क्रमश:)
मधुर भागवतने गाडी घेतली त्याची गोष्ट
सप्टेंबर 11, 2009तर यू टर्न घेण्यापुर्वी माझी ओळख करून देतो.
मी अप्प्या. म्हणजे तसं माझं पूर्ण नाव अपूर्व पुरोहित. पण ते महत्वाचं नाही, कारण माझं नाव अभय देशमुख किंवा गौतम मुनशेटृटीवार किंवा अगदी पद्मनाभन स्वामीनाथनही असू शकेल.
तर फॉर द सेक ऑफ आयडेन्टिफिकेशन…..
यू गॉट इट ना, वाटलंच मला.
परिस्थितीचं पटकन आकलन होणारी माणसं मला फार आवडतात.
म्हणजे त्यांच्याशी माझं पटकन जमतं.
जमतं म्हणजे जमतंच.
तर मधुरशीही आपलं असंच जमलं.
हा पोलिश डेअरीमध्ये तो जॉइन झाल्या दिवसापासून ते आजतागायत.
झकास जमलं.
आता पोलिश डेअरीच का? तर नावाला अर्थ नाही हो.. फॉर द सेक ऑफ.. जाउ दे, तुम्ही चाणाक्ष आहातच.
तर पोरगा पोलिश डेअरीमध्ये माझ्या हाताखाली जॉइन झाला, त्या दिवसापासून आमचं जमलंच.
इंजिनिअरिंग केलेलं पोरगं हुशार असणारच नाही का.
पण हे पोरगं नुसतं हुशारच नाही, तर चौकस आणि चतुरही होतं, म्हणजे आहे.
त्यामुळेच तर तो अखेर गाडी घेणार असा अंदाज मी लावला होता.
तर चौकस म्हणजे कसं बघा,
पहिल्याच आठवड्यात यानं ऍ़डल्टरेशनचा फॉल्ट काढला की हो.
कौतुक वाटलं मला त्याचं. प्रकरण प्रॉम्प्टली मला रिपोर्ट करून संबंधित माणसाला सस्पेन्ड करावं का, असं विचारत होता.
म्हटलं बाबा जरा सबुरीनं घे.
चुका माणसांकडूनच होतात. त्यासाठी कुणाचं करिअर संपवणं बरं नाही. एक संधी द्यायला हवी.
पटलं त्याला.
महिनाभर मग निरूपद्रवी कामांमध्ये बिझी ठेवला त्याला.
नव्यानं नोकरीला लागलेली पोरं नुकत्याच उघडलेल्या शॅम्पेनच्या बाटलीसारखी फसफसत असतात.
ही फसफस निवण्यासाठी निरुपद्रवी कामं बरी.
पण फसफस निवली, तरी किक बसायची राहात नाही.
किक बसायला आपली काही हरकत नाही, पण तोल सुटायला नको.
अशा वेळी दारु-सोड्याचं कॉम्बिनेशन तरी आपल्याला हवं तसं करुन घ्यायचं, नाहीतर दारुच बदलायची.
तोल सुटण्याआधी मला यातलं काहीतरी एक करावं लागणार होतं.
लागणार म्हणजे लागतंच, त्याला इलाज नसतो.
तर महिनाभरानंतर पुन्हा फॉल्ट घेउन आला.
“सर, कुलकर्णींचे चार्ट रिडींग्ज आणि ऍ़क्चुअल ऑइल रिडींग्ज मॅच होत नाहीयेत. “
म्हटलं आता कॉम्बिनेशन बदलायची वेळ आलीये.
“असं कर, ते पेपर्स माझ्याकडे दे आणि तू जा”
“आणि हो, संध्याकाळी काय करतोयस, जरा बसू आज”
तरुण पोरगं आणि बसायला नाही म्हणणार, इम्पॉसिबल.
तर मामला फिट बसवायची अशी तयारी झाली.
(क्रमश:)
मधुर भागवतने गाडी घेतली त्याची गोष्ट
सप्टेंबर 10, 2009अखेर मधुर भागवतने गाडी घेतली.
आता तुम्ही म्हणाल मधुर भागवत कोण?
तर मधुर भागवत हे फक्त नाव आहे, आयडेन्टिफिकेशनसाठी.
खरं तर तो मधुर कांबळे किंवा मधुर जाधव किंवा महंमद गौस किंवा आणखी काही असू शकतो.
तर फॉर द सेक ऑफ आयडेन्टिफिकेशन तो मधुर भागवत आहे.
आता तुम्ही म्हणाल मधुर भागवतने गाडी घेतली यात काय मोठं.
आजकाल सारेच गाडी घेतात. मग याचंच अप्रूप का?
तर गाडी घेणे ही घटना निश्चितच अप्रूप नाही, पण दखलपात्र आहे.
कारण मधुर भागवतचा यापुढचा प्रवास हा गाडी घेणे किंवा न घेणे यापैकी एका निर्णयाचा परिणाम असेल.
आणि त्याचबरोबर त्याचा गाडी घेण्याचा निर्णय ही त्याच्या आतापर्यंतच्या बरृया वाईट, नैतिक-अनैतिक प्रवासाची परिणती आहे.
त्यामुळेच त्याने गाडी घेणे या घटनेला अनेक बाजू आहेत, कारणांच्या आणि परिणामांच्याही.
पण त्याने गाडी घेण्याचा निर्णय घेतल्याने पुढचे परिणाम (त्याच्या दृष्टीनं नैतिक आपल्यापैकी काहींच्या दृष्टीने अनैतिक, किंवा व्हॉटेव्हर अकॉर्डिंग टू युअर थिंकिंग) बरृयापैकी स्पष्ट झाले आहेत. तेव्हा आपलं डोकं त्यावर शिणवा कशाला?
तर आता आपण मधुर भागवतने गाडी का घेतली त्याकडे वळू.
त्याकडे वळायचं म्हटलं तर मोठा यू-टर्नच घ्यावा लागेल.
जसा मधुरनं घेतला, किंवा आपल्यापैकी बरेचजण घेत असतील.
किंवा त्यांना घ्यावा लागत असेल. असो.
तर यू-टर्न.
(क्रमश:)
चार ओळी
ऑगस्ट 1, 2009रात्रभर डोळे मिटले नाहीत
म्हणून सहज मनात डोकावलो..
..तुझ्या आठवणींच्या गर्दीत
झोप हरवलेली होती!
पावसाला…
जुलै 14, 2009तुझं म्हणजे अगदी प्रियकरासारखं -
रुसलास की युगानुयुगं लपणार,
अन्
आलास की स्वत:ला विसरून कोसळणार!
तहान
जुलै 7, 2009पावसानंतर त्याचा
दर्वळ राहून जातो
तसा
गेल्यानंतर तुझा
वावर राहून जातो
पाउस सरतो विखरून थेंब
मातीत सांडलेले
तू गेल्यावर माझे शब्द
मौनात बांधलेले
अंगोपांगी टिपतो श्रावण
ओसरल्या थेंबांचे भास
एकलाच मग वेचित बसतो
रेंगाळलेले ओले श्वास
चिंब भोवती ओल्या भरते
तृप्त तजेली हिरवी भूल
नकळत ठायी पेरित जाते
तव भेटीची तहान खोल
- अमोल कपोले
अमोल यांनी पोस्ट केले
अमोल यांनी पोस्ट केले
अमोल यांनी पोस्ट केले 





