माहित्येय तुला-मला

ऑगस्ट 19, 2009

फांदीवरचं फुल उमलावं
इतक्या सहजतेनं
उमलून आलो होतो जवळ
आणि
गळून पडावं
धुळीत मिसळावं
तितक्या सहजतेनं
मिटून दुरावलोही होतो
पण
निर्माल्य नदीत फेकावं
इतकं सहज नक्कीच नव्हतं
तुझ्यातला मी
अन्
माझ्यातली तू
विसर्जित करणं.

माहित्येय तुला-मला.

त्याच सहजतेनं
पुसलीही असशील
जाणिवेवरली माझी अक्षरं
ओळीनं टिपून मारल्यासारखी
पण
गालावरचे अश्रू पुसावेत तसे
नेणिवेत गोंदले गेलेले संदर्भ
पुसून टाकणं
तेवढं सहज सोपं नाही.

माहित्येय तुला-मला.

सराईतासारखे शिकलोही
रोजचं जगणं हाकायला
पण – सहजच
लागते ठेच कधीतरी
बोचतात खडे-काटे
आणि भळभळतात जखमा
पुन्हा नव्याने.

वेदनेचा बॅलन्स
रिचार्ज होतो
लाईफटाईम व्हॅलिडिटीसह..

ठाउक आहेच तुला-मला..

की इतकं सहज नक्कीच नाही
स्मृतींचं सिमकार्ड
काढून फेकणं!

- अमोल


अर्थ

ऑगस्ट 15, 2009

दिवस सोन्याचा
आज उगवला
सूर्य स्वातंत्र्याचा
नभावर

अडगळीतून
काढा देशप्रेम
दुर्लक्षाची धूळ
पुसा बरे

सर्वत्र भरो रे
आनंदी आनंद
ऑफर्स ओसंडो
मॉल मॉली

चौकाचौकातून
पांढरे बगळे
विकाया बसोत
देश कार्य

घरोघरी चर्चा
पिकनिक पार्टी
देशप्रेम वाहो
ग्लासो ग्लासी

टीव्हीवर चालो
घोष मुक्ततेचा
नग्नतेचे दास
डोळे होती

मुक्त झालो आम्ही
परि ना कळेना
काय खरा अर्थ
स्वातंत्र्याचा

तुका म्हणे जगी
तोच खरा आहे
बनून जो राही
ब्रॅंड नेम

भारत मार्केट की जय !

- अमोल


विषाणु

ऑगस्ट 8, 2009

पहाटेचा अलार्म वाजला तसे सूर्य महाराज खडबडून जागे झाले. स्नान आटोपून, चहा घेवून, न्याहारी करून ते पृथ्वीच्या दिशेने जाण्यासाठी रथात बसणार इतक्यात सूर्यीणबाई कडाडल्या,
“अहो, विसरभोळेपणा कधी जाणार तुमचा?”
आता काय झालं, असा प्रश्न पडून सूर्य महाराज मागे वळले, तर सूर्यीणबाई हातात मास्क घेवून उभ्या.
“पृथ्वीकडे जायचं म्हटलं की तुम्हाला नेहमीच घाई असते हो, मग सख्खी लग्नाची बायकोही दिसेनाशी होते. शून्यनगरीत स्वाईन फ्लूची साथ चालू आहे माहिती आहे ना, हा मास्क नाकावर चढवा आधी अन मग उधळा कुठं उधळायचं ते.”
एरवी अख्ख्या जगाला आपल्या झळांनी सळो की पळो करून सोडणारे सूर्य महाराज.. पण सूर्यीणबाईंच्या समोर त्यांचाही काजवा होतो.
एक शब्दही न बोलता त्यांनी मास्क नाकाला लावला आणि रथ पृथ्वीच्या दिशेने हाकायला सारथ्याला आज्ञा सोडली. बघतात तो सारथ्यानंही नाकाला मास्क लावला होता. एवढंच काय, रथाचे सहा अश्वही आज मास्कमधून जमेल तसं फुरफुरत होते.
हम्म.. मामला गंभीर आहे, तर, सूर्यमहाराज स्वत:शीच म्हणाले. इतक्यात त्यांच्या डोक्यात एक कल्पना चमकली.
“सारथ्या, आज जरा पृथ्वीवर स्वाईन फ्लू ग्रस्त प्रदेशाची पाहणी करावी म्हणतो. सर्वात जास्त लागण कोठे झाली आहेत, तेथे जाउ.”
“पण महाराज, बाकीच्या जगाचं काय, त्यांचा दिवस उगवायचा राहिला, तर कामं खोळंबतील.”
“अरे हो, किरणांना तिकडे धाडून देतो, म्हणजे आपण फिरायला मोकळे.”
किरणांना कामाला लावून सूर्यमहाराजांनी आपला मोर्चा शून्यनगरीच्या दिशेने वळविला.
शून्यनगरीत हाहा:कार माजला होता. लोक नाकातोंडाला मास्क, रुमाल लावून फिरत होते. दवाखान्यांमध्ये नेहमीपेक्षा कित्येक पट गर्दी उसळली होती.
“सारथ्या, इथल्या परिस्थितीबद्दल आम्हाला माहिती देण्यासाठी तू कॉमेंट्रीच सुरु कर बाबा.”

सूर्य महाराज क्रिकेटवेडे आहेत हे सांगायची आवश्यकता नाहीच. त्यामुळे कुठलीही गोष्ट पहायची म्हटलं, की त्यांना कॉमेंट्री हवीच. अहो, परवा सूर्यीणबाईंनी कधी नव्हे ते लाडात येउन त्यांना बागेत नुकताच फुललेला पांढरा गुलाब दाखवायला नेलं, तर त्यासाठी सुद्घा त्यानी कॉमेंट्री हवीच असा हुकूम सोडला आणि आपली हौस पुरवून घेतली. असो.
सारथ्यानं कॉमेंट्री सुरु केली, “महाराज, हे बायडू रुग्णालय, पहा पहा किती गर्दी उसळली आहे. लोक आपली तपासणी करून घेण्यासाठी इथं आले आहेत.”
“सारथ्या, तपासणी म्हणजे नक्की काय करतात रे इथे?”
“तपासणी म्हणजे महाराज निम्म्या लोकांना तपासतात आणि निम्म्यांना न तपासताच तुम्हाला काही झालेलं नाही असं सांगून घरी पाठवतात.”
“अरेरे केवढा हा निष्काळजीपणा. सरकारी रुग्णालय आहे का रे?”
“होय महाराज”
“मग बरोबरच आहे बाबा”
“अरे सारथ्या, एवढा हाहा:कार माजला, तरी सरकारने काही केलं नाही का?”
“केलं ना महाराज. पहिलं म्हणजे, फक्त सरकारी रुग्णालयातच टेस्टिंगची सोय केली. आणि औषधांची मागणी उशिरात उशिरा नोंदवली.
ते का म्हणून?”
“आता ते मी तुम्हाला सांगायला हवं का महाराज. इथंसुद्धा कृत्रिम टंचाई आणि मक्तेदारी निर्माण करायची आणि आपल्या तुंबड्या भरायच्या.”
“वा,फारच कार्यक्षम सरकार आहे म्हणायचं? अरे पण सारथ्या, यांचे लोकप्रतिनिधी काही दिसत नाहीत, कोण आहेत इथले लोकप्रतिनिधी?”
“महाराज, एकापेक्षा एक चॅम्पियन नेते आहेत बरं का इथले. हा फजितदादा कुमारांचा बंगला, ते शून्यनगरीचे पालकमंत्री. तो तिकडे भुरेश सुरमाडींचा बंगला, ते इथले खासदार. तो तिकडे सूरप्रियाताई घोळेंचा महाल, त्या भानामतीच्या खासदार, पण इथंच पडीक असतात. बचत बचत खेळत असतात.”
“आता हे भानामती काय प्रकरण आहे?”
“शू… महाराज हळू बोला. भानामती हे शहर आहे, मोठ्या साहेबांचं. भानामती करण्यात लय हुशार आहेत ते.”
“हो का?”
“मग, जिथे लक्ष्मी असेल, तिथून ती चालत येउन बरोबर यांच्या गळ्यात माळ घालते अशी भानामती करतात हे. सध्या त्यांनी भिशीची आय ला भानामती केली आहे.”
“भिशीची आय?”
“अहो आपली चेंडू फळी संघटना. सध्या तिथेच असतात हे, लवकरच म्हणे आयशीची आय पन यांच्या गळ्यात माळ घालणार आहे.”
“आता ही आयशीची आय कोण?”
“आंतरराष्ट्रीय चेंडू फळी संघटना.”
“अस्सं, बरेच कर्तबगार दिसतात हे तुमचे सायेब. पण एवढा गोंधळ माजलाय तुमच्या शून्यनगरीत, कोठे दिसत नाहीत ते लोकांना धीर देताना. दादा पण नाही, ताई पण नाहीत आणि भाई पन नाहीत. ऑ?”
“अहो महाराज, पक्के बिझनेसमन आहेत ते. त्यांना आपला टारगेट ऑडियन्स बरोब्बर माहिती आहे.”
“म्हणजे?”
“म्हणजे असं बगा, ही साथ पसरली आहे तो आहे आपला मध्यमवर्ग. तो कुणाच्या अध्यात ना मध्यात. म्हणून मग यांनी पण ठरवलं, आपण तरी कशाला पडा यांच्या अध्यात अन मध्यात.”
“मग यांचा टारगेट ऑडियन्स कोणता म्हणतोच सारथ्या?”
“आता तो जरा वादग्रस्त मुद्दा आहे महाराज, उघड बोलावं तर लगेच दंगे-धोपे होतील आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होईल.”
“असू दे, असू दे, समजलो मी. अरे पण सारथ्या, हा स्वाईन फ्लु फारच भयंकर आजार आहे का रे?”
“नाही महाराज. वेळेत उपचार केले की लगेच बरा होणारा आहे, पण सध्या लोकांमध्ये घबराट आहे ना त्यामुळे तो फारच भीषण वाटतोय खरा. खरं सांगू का महाराज, या रोगाच्या विषाणूपेक्षा हे काही न करणारे सरकारी आणि राजकीय जंतू आहेत ना ते कैकपटीने विषारी आहेत.”
“मग यांच्या प्रतिबंधासाठी नाही का एखादी लस?”
“आहे ना महाराज. निवडणुका. मतदान. आता येणाऱ्या निवडणुकीत लोक यांना ती लस टोचतीलच.”
“अस्सं, सगळी मजा मजाच आहे बाबा सारथ्या या शून्यनगरीत. पण आता तू जास्त वेळ थांबू नको बरं. आपल्याला परतायला हवं आता. नाही तर हे विषाणू आपल्याला येउन चिकटायचे.”
“बरं महाराज, “असं म्हणून सारथ्यानं रथ पश्चिमेकडे वळवला. शून्यनगरीतल्या क्षुद्र पुढाऱ्यांचे विचार विषाणूसारखे झटकत सूर्य महाराज परतीचा मार्ग आक्रमू लागले.
…समाप्त…


प्रथम’दर्शनी’…

ऑगस्ट 4, 2009

डिंग डॉंग
(दार उघडल्याचा आवाज)
“येस?”
“अं, श्वेता आहे का ?”
“श्वेता.. बाहेर गेलीय..”
“अं..मी तिची फ्रेंड.. रसिका”
“अं..हो का, ये ना मग आत”
“…”
(दार लावल्याचा आवाज)
“प्लीज हॅव अ सीट”
“थॅंक्स”
“श्वेता आत्ता दोन मिनिट आधीच खाली गेली.”
“हो का, पण तिने मला अकराला बोलावलेलं..”
“हो का, इथं जवळच गेलीय ती, औषधं आणायला, येईलच एवढ्यात.”
“अच्छा”
“अं.. तू?”
“मी श्वेताचा कझिन ब्रदर. “
“अच्छा..”
“अरे, मी तुला पाणी पण विचारलं नाही. आय ऍम सॉरी..”
(घाईत चालण्याचा आवाज. पलिकडच्या रूममध्ये फ्रीज उघडून बाटली काढल्याचा आवाज. पाणी ग्लासात ओतल्याचा आवाज.)
“इटस ओके, अं..”
“निखिल, माझं नाव, आणि हे पाणी.”
“थॅंक्स”
“तू श्वेताच्या ऑफिसमध्ये असतेस का ?”
“हो..”
“इथं पहिल्यांदाच आली आहेस ना”
“अं, हो…”
“तुझ्या एकूण अवघडलेपणावरून वाटलंच मला. रिलॅक्स. बी कम्फर्टेबल. पेपर हवा असेल, तर तिथे टिपॉयखाली आहे. टीव्ही लावू का ?”
“नाही… नको..”
“…”
“नाईस सेंट.. सॉरी.. डिओ आहे ना?”
“अं.. हो”
“फा चा ऍक्वा. माझा पण फेव्हरिट आहे.”
“माझा पण..”
“कॉफी घेणार?”
“नाही, नको, मी चहा-कॉफी घेत नाही.”
“मग सरबत?”
“चालेल. पण श्वेतालाही येवू देत. तिघं बरोबर घेवू.”
“ओके.”
(पलिकडच्या रूममध्ये ग्लासात पाणी ओतण्याचा आवाज. बरणी उघडल्याचा आवाज. चमच्याने ग्लासांतल्या पाण्यात पावडर टाकल्याचा आवाज. संत्र्याचा आंबट गोड वास. बरणी लावल्याचा आणि चमच्याने सरबत हलवल्याचा आवाज. फ्रीज उघडून काही सेकंदांत पुन्हा लावल्याचा आवाज.)
“चला.. सरबत तयार करून ठेवलंय.”
“हं.. यू आर सो फास्ट.”
“सो आय ऍम. शुभ काम में देरी क्यों?”
“हम्म..”
“इफ यू वोन्ट माइंड. मी जरा आत बसतो. मला जरा प्रॅक्टिस करायचीय. यू कॅन एन्जॉय दी टिव्ही. येईलच श्वेता एवढ्यात.”
“ओके, फाईन.”
(बटणं दाबल्याचा आवाज. रिमोटने टीव्ही लावल्याचा आवाज.)
“हिअर.. हेल्प युअरसेल्फ.”
“थॅंक्स.. बाय द वे.. कसली प्रॅक्टिस करतोस तू?”
“सिंथी.”
“तू सिंथी वाजवतोस?”
“वाजवत नाही, शिकतोय.”
“पण म्हणजे तेच ना.”
“तेच कसं ? असू दे.. तुला पण म्युझिक मध्ये इंटरेस्ट दिसतोय?”
“इंटरेस्ट? आय ऍम मॅड फॉर इट.”
“अरे वा, छानच..”
“काय वाजवतेस तू?”
“वाजवत नाही, गाते.. सॉरी.. गाणं शिकते आहे.”
“गुड.. मस्तच. खरं तर प्रॅक्टिस करताना मला रुममध्ये कुणी आलेलं आवडत नाही. बट, वूड यू लाईक टू जॉइन मी?”
“नको.. कारण मलाही रियाझाच्या वेळी कुणी जवळ असलेलं आवडत नाही. सो डोन्ट अपोलोजाईझ.”
“ओके देन, फॅन्टॅस्टिक. मी जरा आत बसतो.”
(सिंथेसायझरवर अतिशय नाजूक सुरावटी छेडल्या जात आहेत. विलक्षण रोमॅन्टिक स्वरमिलाप. एकेका स्वरावर लडिवाळ हरकती आणि निर्जीव वाद्यातून सजीव, सुंदर, अबोल भावनांची नक्षी वातावरणावर उमटते आहे. अतिशय इन्टेन्स स्वरलहरी.. आणि आता त्यात एक सुरेख आणि सुरेल स्वर मिसळला आहे. प्रचंड गोडवा असलेला आणि भावनांनी भिजलेला आर्द्र स्वर. आसमंत म्हणजे एक गाणं झाल्यासारखं भारलेपण चोहीकडे भरून राहिलं आहे.)
“वॉव, कसली गातेस तू, ऑसम”
“आणि तूही भन्नाट वाजवतोस”
“मझा आला”
“मला पण, फक्त मधल्या द्रुत लयीत जो पीस आहे ना, त्याला थोडा पिलूचा टच दिलास ना, तर त्यातली समर्पणाची भावना आणखी गहिरी होईल.”
“हम्म.. हे माझ्या डोक्यातच आलं नव्हतं. खरंच.”
“हे तू कम्पोज केलंयस?”
“हो”
“नाईस कॉम्पोझिशन”
“खरं तर मला विशेष आवडलं नव्हतं, पण तू मघा जे गायलीस त्यामुळे इट रिअली साउंडस नाईस.”
“इट वॉज रिअली अमेझिंग.. तू जे वाजवलंस”
“.. आणि तू जे गायलीस.”
“…”
“…”
(दोनच क्षण शांतता. इतकी, की वेगाने होणाऱ्या श्वासोच्छवासाचे आणि धपापणाऱ्या उरांचे आवाज कानठळ्या बसवताहेत.)
“डिंग डॉंग.”
“…”
“…”
“अरे.. श्वेता आली वाटतं.”
“बहुतेक”
(दार उघडल्याचा आवाज. मोठा पॉज.)
“श्वेता, बराच वेळ लागला तुला. ही रसिका केव्हाची येवून बसल्येय.”
“रसिका? कोण रसिका?”
(पाच-दहा सेकंद अवघडलेली शांतता ऐकू येते आहे.)
“हे श्वेता राजहंसचं घर नाहीये बहुतेक. तिचा आवाज असा नाही.”
“राजहंस? अच्छा, तुझा घोटाळा झाला तर, हे नगरकरांचं घर आहे. ती श्वेता पलिकडच्या विंगमध्ये राहते.”
(पडलेला आवाज) “आय ऍम सॉरी.. मला..”
“इटस ओके.. दारावरची पाटी बदलायला दिलीय बाबांनी. त्यामुळे तुला कळायला चान्स नव्हता.”
(पडलेला आवाज) “म्हणजे ही तुझी फ्रेंड नाही तर..”
“ऑफ कोर्स नॉट..”
“एनीवे आपण मात्र एकदम फास्ट फ्रेंडस झालोय, नाही का रसिका?”
“हो ना.”
“सो, तुला इथे पुन्हा यावंसं वाटलं, तर ये”
“शुअर, थॅंक्स फॉर द म्युझिकल ट्रीट”
“सेम हिअर”
“ओके, निखील, नाइस मिटिंग यू, बाय श्वेता”
“बाय रसिका, मी येवू का तुला सोडायला”
“नको गं, जाईन मी, आय कॅन मॅनेज”
“या, आय नो.. फक्त शेवटची पायरी जरा जास्त उंच आहे, तेवढी जपून उतर, डोळस माणसंही फसतात नेहमी. डोन्ट माइंड, बाय..”
(दार लावल्याचा आवाज)
“माय गॉड निखिल, चार दुकानं फिरले तेव्हा मिळाला तुझा फा डिओ. हा घे..”
“एक मिनिट श्वेता, तू काय म्हणालीस तिला जाताना, डोळस माणसंही फसतात म्हणजे..”
“म्हणजे अरे तीही तुझ्या- आय ऍम सॉरी.”
“माझ्यासारखीच म्हणजे यू मीन..”
(उदास स्वरात) “हो..”
“…”
“…”
(शांततेचा कोलाहल ऐकू येत राहातो.)

- अमोल


चार ओळी

ऑगस्ट 1, 2009

रात्रभर डोळे मिटले नाहीत
म्हणून सहज मनात डोकावलो..

..तुझ्या आठवणींच्या गर्दीत
झोप हरवलेली होती!


आजही!

जुलै 30, 2009

आजही..
दिवसाच्या त्या क्षणांना
तुझाच गंध येतो
परसातल्या कळ्यांना
तुझा सुगंध येतो

आजही..
हृदयातल्या ऋतुंना
तुझा वसंत येतो
विरहार्त या स्वरांना
कोकीळ कंठ देतो

आजही..
घायाळ पैंजणांना
बेताल खंत देतो
पायातल्या स्मृतींना
तुझी पढंत देतो

आजही..
पातक तुझे करूनी
मी नीतिमंत होतो
श्रद्धा तुझ्याच ठायी
अर्पून संत होतो

आजही..
झरण्या तुझ्या प्रवाही
अश्रू उसंत घेतो
प्रीतीस भग्न माझ्या
कीर्ती दिगंत देतो!

- अमोल


गजरा

जुलै 28, 2009

दिवसाने मिटले पंख
रात्रीच्या गर्द मिठीत
निद्रेचे डोळे उघडे
स्वप्नांचे थेंब दिठीत

नयनांत उतरुनी चंद्र
पापणीत माझ्या झुरतो
वीणेचा सूर दिवाणा
तारेस छेडूनी विरतो

विरहाच्या शय्येवरती
काळोख बदलतो कूस
प्रहरांच्या पाठीवरती
अश्रुंचे मुके नि:श्वास

तो नभी धुक्याचा धागा
मेघांचे शेले विणतो
ताऱ्यांच्या मागावरती
तेजाचे दोहे म्हणतो

ही पहाट फेडत जाते
तुझिया प्रीतीचे देणे
पूर्वेच्या वेशीवरती
किरणांचे धाडूनी मेणे

मग सरते रात्र विराणी
सूर्याच्या चुकवित नजरा
सोबतीस सोडून जाते
हा आठवणींचा गजरा !

- अमोल


अमृतस्वर

जुलै 27, 2009

पाउस येता असेच होते
तुझ्यासाठी मन पिसेच होते

भरून येता घनात वादळ
तुझाच आठव मनात केवळ

अशी लकाके वीज नभावर
तुझ्या हसूचा भास..पळभर!

पाउस येता मन बावरते
सुसाटते, तुजसाठी धावते

पाउस होतो तुझीच चाहूल
सरीसरींतून तुझेच पाउल

पाउस गातो तुझेच गाणे
मनी छेडतो तुझे तराणे

पाउस सरतो मला भिजवूनी
ओढ तुझी तन्मनी रुजवूनी

सांग प्रिये, तू होशील ना सर
तशी लाघवी, तशीच सुंदर

अंगांगी जाशील ना भिनवूनी
तव श्वासांचे ते अमृतस्वर!

- अमोल


दृष्‍टांत (अखेर)

जुलै 25, 2009

(देवळाची पायरी कधीही न चढणाऱ्या आपल्या नवऱ्याला आज नेहमीपेक्षा जास्त चढलेली आहे, असं समजून त्यांचं बोलणं फारसं मनावर न घेता सुभद्राबाईंनी तो विषय तेथेच संपवला.

रामरावांना मात्र त्या रात्री झोप आलीच नाही.)

दुसऱ्या दिवशी रामरावांची सकाळ भराभरा फोन फिरवण्यात गेली.
दुपारी जेवणानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मिटिंगा चालू होत्या. तलाठी, आर्किटेक्ट, प्लॅनर, इंजिनिअर.. चर्चा झडू लागल्या. रामरावांना आता झोपायची उसंत मिळेना. डोक्यात आलेली योजना प्रत्यक्षात येईपर्यंत आता ते थांबणार नव्हते. नदीकाठच्या दोन एकरांच्या तुकड्यावर संग्रामरांवांच्या नव्या बिझनेसची उभारणी सुरु झाली आणि सात-आठ महिन्यांतच काम पूर्णही झालं. दरम्यानच्या काळात रामरावांना झालेल्या आयतेश्वराच्या दृष्टांताची बातमी कर्णोपकर्णी होत गावभर, नव्हे तालुकाभर पसरली होती.
रामरावांना म्हणे आयतेश्वराचा दृष्टांत झाला, खरं का?
खरं का म्हणजे काय गड्या, नदीकाठी काम बी सुरु झालंय म्हणे.
अशा चर्चाही झडू लागल्या. अधूनमधून रामरावांच्या कानावरही पडू लागल्या.
सारं काही नियोजनानुसार होतंय हे पाहून रामराव मिशीतल्या मिशीत हसले.
अखेर तो दिवस उजाडला.
नदीकाठी आज सरकारी, निमसरकारी, राजकीय, सामाजिक वाहनांची मांदियाळीच दाटली.
त्यासोबत तालुक्यातले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि रामरावांची भावकीही.
नाही म्हटलं, तरी किमान पाच हजारांचा लवाजमा पाहून रामराव सुखावले. पेपरातल्या जाहिरातींनी काम चोख बजावलं होतं म्हणायचं.
परिसराला जत्रेचं स्वरुप आलं होतं. नदीकाठचा प्रसन्न परिसर मंत्रपठणाने दुमदुमून गेला. घंटानाद चहुदिशांना भरुन राहिला. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रथम वास्तुचं उद्‌घाटन करण्यात आलं.
आज लोकांनी प्रथमच त्या वास्तूत प्रवेश केला.
एकदम डिट्टो
प्रतिरुपच हो
काय बी फरक नाही बघा
अशा प्रतिक्रिया प्रत्येकाच्या तोंडातून उमटू लागल्या.
..आणि गाभाऱ्यातली मूर्ती पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली.
हुबेहूब आयतेश्वर.
देवा, तुझी लीला अगाध आहे. प्रत्येकजण भारावून गेला.
पालकमंत्र्यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि सभामंडपातल्या विश्वस्त मंडळाच्या बोर्डचंही अनावरण त्यांच्याच शुभहस्ते करण्यात आलं. अखेर प्रति-आयतेश्वराच्या उभारणीत प्रकल्पाला मंजुरीपासून आर्थिक अनुदान देण्याचं पुण्यकर्म त्यांच्याच आशीवार्दाने झालं होतं.
भारावलेल्या या वातावरणात सुभद्राबाईंच्या आनंदाला पारावार नव्हता.
आयतेश्वरानं त्यांची प्रार्थना ऐकली होती. संग्रामरावांनी नवी जबाबदारी स्वीकारण्याचं कबूल केलं होतं.
हाताला मळ नाही, पायाला मळ नाही. सगळं काही आयतेश्वर घडवून आणेल, हे आश्वासन आणि रामरावांचं नियोजन त्यांच्यासाठी पुरेसं होतं.
त्यामुळेच विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर संग्रामरावांचं नाव मोठ्या दिमाखात झळकत होतं.
गावभर रामरावांच्या देवभक्तीची आणि दृष्टांताची चर्चा होती.
प्रति आयतेश्वराची प्रसिद्धी आता दिवस रात्र वाढणारच होती.
भक्तांचा ओघ आणि त्यासोबत ओघानेच येणारी समृद्घीही.
सर्वांचीच इच्छा सफल झाली होती.

मेंढरांना नवा कळप मिळाला होता
आणि
गुरांना नवं कुरण.

प्रति-आयतेश्वराच्या गाभाऱ्यातला दिवा मात्र तेवढ्याच निर्मळपणे आणि तेजस्वीपणाने तेवत होता.

(समाप्त)

- अमोल


दृष्टांत (भाग२)

जुलै 21, 2009

(…पण अनेकांना व्यावहारिक सल्ले देण्याची कला त्याच्याकडे होती, आणि त्या सल्ल्यांमुळे बऱ्याच जणांचा फायदाही झाला होता. रामरावांनाही. त्यामुळेच आज त्यांचे पाय पुन्हा गणा मास्तरकडे वळले होते.)

“यावं, यावं फुडारी. आज एकदम हिकडं कसं?”
किल्लीच्या टोकानं कान कोरत गणा मास्तरनं रामरावांचं स्वागत केलं. गाडीत बसण्याच्या बेतात असलेला गणा मास्तर रामरावांना येताना बघून थांबला होता.
“काय मास्तर, दौऱ्यावर का?” रामरावांनी प्रतिप्रश्न केला.
“आयतेश्वराला चाललो होतो. गुरुवारचा नेम आहे आमचा. देवधर्मावर तुमची श्रद्धा नाही ते ठाउक आहे, पण तरी विचारतो, येताय का?”
नको, असं रामरावांच्या अगदी जिभेवर आलं होतं. ते निकरानं टाळत त्यांनी प्रतिप्रश्न केला.
“म्हंजे तुम्हाला परतायला रात होणार?”
“नउ तरी वाजतीलच बघा”
“अस्सं..” कानाची पाळी खाजवत रामराव बोलले, “मग चला तर.. आम्ही बी येतो. बघु तरी तुमचा आयतेश्वर काय म्हणतोय.”
गाडी रस्त्याला लागली तशी रामरावांनी मुद्यालाच हात घातला.
“मास्तर, ह्या संग्रामरावांनी पार वैताग आणलाय बघा आम्हाला. कशी ह्याची गाडी रुळाला लागनार काही कळंना झालंय बघा.”
“पुढारी, तुम्ही आयतेश्वराला यायला तयार झालात तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. संग्रामरावांचं प्रकरण दिसतंय.”
“काय सांगू मास्तर. आपलेच दात आन आपलेच ओठ. पोरगं तिशीला टेकल आता. पन अजून हात पाय हलवायची इच्छा नाही. आमची पुण्याई किती दिवस पुरणार?”
“बरोबर आहे पुढारी. तुम्ही त्याचं लग्न का लावून देत नाही? अंगावर जबाबदारी पडली, की लागेल लायनीला.”
“लगीन काय, मी उद्या बी लावून देईन हो. पोरींचे बाप डोळा ठेवून आहेत आमच्यावर. पण लग्नानंतरही याने काय केलं नाही, तर आमची अब्रू ती काय ऱ्हायली मास्तर.”
गणा मास्तरनं एक नि:श्वास सोडला.
“तुमच्या या समश्येवर आमच्याकडं बी काय उपाय नाही बघा पुढारी. आता काय गाऱ्हाणं मांडायचं ते आयतेश्वरापुढंच मांडा. तुम्हाला आवडणार नाही, पण माझं ऐका. ही वारी फुकट जाणार नाही.”
रामराव काहीच बोलले नाहीत. पोराच्या नाकर्तेपणाला आयतेश्वर काय करणार, असा प्रश्न त्यांच्या मनात आला.
तेवढ्यात आयतेश्वर आलंच.
गर्दीमुळे गाडी अलिकडेच पार्क करून मास्तर आणि रामराव मंदिराच्या दिशेनं निघाले.
निरिच्छेनंच दर्शनाला चाललेले रामराव आजूबाजूचं निरीक्षण करत चालले. पूजा-सामानाची, फुला-माळांची, आयतेश्वराचं लॉकेट, फोटो, अंगठी, चेन, शो-पीस, कॅसेट, सीडी अशा चीजवस्तूंच्या दुकानांची रांग दुतर्फा लागली होती. दोन-चार दुकानांत आयतेश्वराची कोणी “लोकल सुरेश वाडकरनं” गायलेली गाणी ढणाणा वाजत होती. चित्रपटाच्या गाण्यांच्या चालीवर आयतेश्वराची गाणी.. सारं काही आयतेश्वरमय होतं. गुरुवार असल्याने मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती. दर्शनाच्या रांगेत उभं असताना रामराव सारं काही टिपत होते.
साधा अभिषेक – 501 रु.
साग्रसंगीत अभिषेक – 1001 रु.
साद्यंत साग्रसंगीत अभिषेक – 5001 रु.
असा बोर्ड वाचून त्यांची करमणूक झाली.
आयतेश्वराची मूर्ती पाहून मात्र त्यांचा सगळा वैताग, शीणवटा पार पळून गेला. त्यांना प्रसन्न वाटू लागलं. मूर्तीपुढे नतमस्तक होवून परतताना कोपऱ्यात ठेवलेली भली मोठी दानपेटी त्यांच्या नजरेतून सुटली नाही.

रामराव घरी परतले ते एकदम खुशीत. रात्रीचं जेवण घेताना त्यांनी सुभद्राबाईंना पुन्हा-पुन्हा “संग्रामची गाडी आता कशी रुळाला लावतो पहाच”,असं सांगितलं.
“कशी ?” असं विचारल्यावर मात्र त्यांनी काही उत्तर दिलं नाही.
“मला दृष्टांत झालाय,” एवढंच ते उत्तरले.
देवळाची पायरी कधीही न चढणाऱ्या आपल्या नवऱ्याला आज नेहमीपेक्षा जास्त चढलेली आहे, असं समजून त्यांचं बोलणं फारसं मनावर न घेता सुभद्राबाईंनी तो विषय तेथेच संपवला.

रामरावांना मात्र त्या रात्री झोप आलीच नाही.

(क्रमश:)